अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; चाहते म्हणतात ‘ये कब हुआ?’
ही बातमी आहे तिच्या आयुष्यात आलेल्या एका गोड बाळाची
मुंबई : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं सध्या सर्वच स्तरांवर या माध्यमाचा विविध मार्गांनी वापर केला जातो. कोणी आनंदाची बातमी देण्यासाठी, कोणी नवी सुरुवात जाहीर करण्यासाठी तर कोणी आणखी कोणत्या कारणासाठी या माध्यमाचा वापर करताना दिसतं. सध्या एका आघाडीच्या अभिनेत्रीनं या माध्यमाचा असाच काहीसा वापर करत सर्वांनाच एक गोड बातमी दिली आहे.
ही बातमी आहे तिच्या आयुष्यात आलेल्या एका गोड बाळाची. ही अभिनेत्री आहे ‘दृश्यम’ फेम श्रिया सरण. श्रियानं पती Andrei Koscheev याच्यासोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं क्वारंटाईन काळ नेमका कसा होता याची सुरेख झलक सर्वांसमोर आणली आहे.
एका मुलीला जन्म दिलेल्या श्रियानं हा प्रवास नेमका कसा होता याबाबत सर्वांनाच सांगितलं. श्रियानं लग्नाचं वृत्तही अशाच पद्धतीनं दिलं होतं. ज्यानंतर आता थेट तिनं आई झाल्याचीच बातमी दिली. अर्थात चाहत्यांना यामुळं आनंद झाला, पण काहींनी श्रियाला हे सर्व कसं आणि कधी झालं असं म्हणत हक्कानं प्रश्नही विचारला. सहसा सेलिब्रिटी एका टप्प्यानंतर अशा बातम्या जाहीर करतात. पण, श्रियानं सर्वांनाच मुलीच्या जन्माची बातमी देत आश्चर्याचा धक्का दिला.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये श्रियानं लिहिलं, ‘लोकहो आमचं 2020 एकदम वेगळं आणि तितकंच सुंदर गेलं. क्वारंटाईन सुंदर गेलं. सारं जग एका वेगळ्या टप्प्यातून जात असताना आमचं जग मात्र कायमस्वरुपी बदललं. एक असं जग ज्यामध्ये थरार आहे, उत्साह आहे आणि खुप काही शिकण्यासारखं आहे. एका परीला आमच्या आयुष्यात आणल्याचा आनंद आहे. हे आमचं नशीब आहे आणि यासाठी आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोत.’
2018 मध्ये श्रियानं आंद्रेशी लग्नगाठ बांली होती. राजस्थानमध्ये अतिशय खासगी स्वरुपात हा विवाहसोहळा पार पडला होता. मुख्य म्हणजे ती स्पेनहून भारतात परतली तेव्हापासूनच तिच्या गरोदरपणाच्या चर्चांना उधाण आलं होतं.