पालकांच्या घटस्फोटानं अभिनेत्री हादरली; लग्न करण्याचा विचारानेही विचलित
हे परिणम फार सकारात्मक असतात, पण काही वेळेस त्यांना नकारात्मक झाकही असते.
मुंबई : असं म्हणतात, की आई- वडिलांमध्ये असणारं नातं आणि त्यांच्या एकमेकांप्रती असणाऱ्या वागणुकीचे मुलांवर थेट परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणम फार सकारात्मक असतात, पण काही वेळेस त्यांना नकारात्मक झाकही असते.
एका अभिनेत्रीवर आई- वडिलांच्या नात्यात आलेला दुरावा असाच नकारात्मक परिणाम करुन गेला. हल्लीच दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबतचा खुलासा केला. ही अभिनेत्री आहे, श्रुती हासन.
अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची ही लेक. आईवडिलांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर श्रुती मुंबईत आली. इथं तिनं बरीच वर्षे वास्तव्यही केलं. पण, आजही हिंदी कलाजगतामध्ये तिला दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणूनच ओळख दिली जाते.
आपल्याला दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणूननच गणलं जाण्याबाबत श्रुतीनं काहीसा नाराजीचा सूर आळवला. गेल्या काही दिवसांपासून श्रुतीच्या खासगी आयुष्याच्याही बऱ्याच चर्चा झाल्या.
याच्याशीच संबंधित प्रश्न तिला विचारला असता, जीवनाच्या या वळणावर मी लग्नासाठी काहीशी घाबरते. ही एक अशी गोष्ट आहे, जिच्यासाठी मी एकाएकी तयारही होणार नाही. माझ्या आईबाबांच्या लग्नातील फक्त चांगल्याच आठवणी मी लक्षात ठेवते, असं ती म्हणाली.
आपल्या आईवडिलांच्या लग्नामागे अतिशय चांगल्या भावना होत्या, असं सांगताना हे नातं जेव्हा योग्य मार्गावर होतं तेव्हा हे लग्नही यशस्वी होतं. त्यामुळे मीसुद्धा त्यातील चांगलेपणाच पाहते अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
काही नाती टिकतात तर, काही अडखळतात. पण मी मात्र नात्यांची चांगली बाजूच कायम पाहते असं म्हणत आपल्या आईवडिलांचं नातं बऱ्याच चढ उतारांतून पुढे गेल्याचं तिनं सांगितलं.
त्यांचं वैवाहिक नातं टिकलं नाही, याचा अर्थ माझा विवाहसंस्थेवर विश्वास नाही असा होतच नाही, असं ठाम मत सर्वांपुढे ठेवत आता आपण लग्नाच्या विचारात नसल्याचं श्रुतीनं स्पष्ट केलं.