Sonali Phogat Death Case : गोव्यात जायचा बेत नसतानाही, सोनाली फोगाट तिथं पोहोचल्याच कशा?
मृत्यूभोवती संशयाचा विळखा
Sonali Phogat Death Case : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. सोनाली यांचा इतक्या कमी वयात झालेला मृत्यू बरेच प्रश्न उपस्थित करुन गेला. मुख्य मुद्दा असा, की सोनाली यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची तक्रार गोवा पोलिसांनी दाखल केली.
सोनाली यांचा भाऊ, रिंकू ढाकानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बहाण्यानं गोव्यात आणलं गेलं. पण, इथं कोणतंही चित्रीकरण होणार नव्हतं. कुटुंबाला हे चित्रीकरण 24 ऑगस्टला होणार होतं, पण हॉटेल मात्र 21-22 ऑगस्टसाठीच बुक करण्यात आल्याची माहिती असल्याचंही त्यानं दिली. (actress tunred bjp leader Sonali phogat death controversy details big news)
'गोव्यात येण्याचा तिचा कोणताच बेत नव्हता. पूर्वनियोजीत आराखड्यानुसार तिला इथं आणलं गेलं. तिथं कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण होणार नव्हतं. हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी फक्त दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या', असं रिंकूनं सांगितलं.
रिंकूनं केलेल्या आरोपांनुसार सोनाली यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. यासाठी त्यानं सोनाली यांचे PA सुधीर सांगवान यांच्यासह त्यांचे मित्र सुखविंदर यांच्यावर यांना दोषी ठरवलं आहे. सोनाली यांना अंमली पदार्थ देत त्यांच्यावर यादोघांनीही बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप रिंकूनं केला.
दरम्यान, सदर प्रकरणी गोवा पोलिसांनी तपासही सुरु केला असून, फोगाट यांच्या पीएला ताब्यात घेण्यात आलं आहे.
वाचा : टिकटॉकमधून सोनालीची कोट्यवधींची कमाई, इतक्या संपत्तीची होती मालकीण
'अंजुना पोलीस स्थानकात सोनाली यांची हत्या करण्यात आल्या प्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी अद्यापही तपास सुरु आहे. मृतकांच्या भावानं त्यांचा PA आणि आणखी एका व्यक्तीवर आरोप केले आहेत', अशी माहिती गोवा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.