4 वर्षे विभक्त राहणाऱ्या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीकडून घटस्फोटाचा निर्णय
सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती
मुंबई : नाताळसणाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असताना टेलिव्हिजन विश्वातील जोडीच्या आयुष्यात मात्र मोठं वादळ आल्याची माहिती समोर येत आहे. मुळात हे वादळ काही वर्षांपूर्वीच आलं होतं. पण, आता मात्र त्या वादळाचे परिणाम दिसून येत आहेत.
टीव्ही अभिनेता विवियन डीसेना (Vivian Dsena) आणि त्याची पत्नी, वाहबिज दोराबजी (Vahbiz Dorabjee) यांनी अखेर वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
साधारण 4 वर्षांपासून वाहबिज आणि विवियन वेगळे राहत आहेत. ज्यानंतर आता त्यांनी घटस्फोटाचा निर्णय़ परस्पर सामंजस्यानं घेतला आहे.
‘प्यार की एक ये एक कहानी’ मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. ज्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
2013 मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या नात्यात अनेक गोष्टी बदलल्या. परिणामी 2017 ला त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.
अर्ज केल्याक्षणापासून ही जोडी विभक्त राहत आहे. जवळपास चार वर्षांपासून सुरु असणाऱ्या घटस्फोटाच्या खटल्यावर आता त्यांनी अंतिम निर्णय समोर आणला.
'ही अतिशय दु:खाची बाब आहे. पण, आम्ही कायदेशीररित्या विभक्त झालो आहोत. बऱ्याच वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत होतो, की आमच्यामध्ये सारंकाही सुरळीत होईल.
पण आता आयुष्य वेगळ्या वाटांनी जगण्याच्या निष्कर्षावरच आम्ही पोहोचलो आहोत. हा निर्णय आम्ही दोघांनीही मिळून घेतला आहे.
इथे मतभेद कोणामुळे झाले, यावर भर देण्याची गरज नाही', असं विवियन आणि वाहबिज यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले.
दोघांच्याही भल्यासाठीच हा निर्णय़ घेतला असल्याचं विवियननं सांगत प्रत्येक अंतानंतर एक नवी सुरुवात असते असा आशावादही व्यक्त केला.
तर वाहबिजनंही हे लग्न आणि हे नातं आता एक संपलेला अध्याय आहे, असं म्हणत येणारा काळ शांतता आणि आनंद आणणारा असेल अशी आशा व्यक्त केली.