दिशा सालियानचा मृत्यू नक्की कसा झाला? वाचा काय म्हणाला मित्र रोहन रॉय
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. पण त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिनेही आत्महत्या का केली, या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्याही आत्महत्येचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे.
सुशांतची मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या दिशाने 2020 मध्ये आत्महत्या केली होती. आता या घटनेच्या 2 वर्षानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने रोहन रायने अनेक मोठे खुलासे केलेत. दिशाच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर काय झालं, याबाबत रोहनने सांगितलं.
रोहनला जीवे मारण्याच्या धमक्या
दिशा सालियन मॉडेल आणि अभिनेत्री रोहन रॉयसोबत लग्न करणार होती. लग्नाच्या काही दिवसांआधी दिशाने मालाडमधील तिच्या फ्लॅटमधून 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. रोहनने 2 वर्षांनंतर दिलेल्या मुलाखतीत दिशाच्या आकस्मिक मृत्यूबद्दल सांगितलं आहे. दिशा गेल्यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्याचं रोहनने सांगितलं.
त्या रात्री काय झालं?
"दिशा खूप संवेदनशील होती. आम्ही दोघे दादरमध्ये कुटुंबियांसोबत राहत होतो. आपण मालाडच्या अपार्टमेंटमध्ये जाऊया, असं मी तिला 4 जूनला सांगितलं. कदाचित यामुळे तिचा मूड बदलेल. या विचाराने मी तिला असं बोललो. आमच्यासोबत माझे 4 मित्रही होते", असं रोहन म्हणाला.
"त्यादिवशी आम्ही खूप ड्रिंक केलं होतं. मी एका मैत्रिणीशी फोन वर बोलत होतो. तितक्यात ती बेडरूम मध्ये गेली. खूप वेळ झाला ती आली नाही. मग आम्ही सगळे शोधाशोध करु लागलो. मी पाहिलं की रूमची खिडकी उघडी होती. तिथून खाली पाहिलं. बघितल्यावर तिचा पायजमा दिसला, जो पाहून मी घाबरलो. मलाही आत्महत्या करायची होती. हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं. मी आणि दिशा जवळपास 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो" असंही रोहनने या मुलाखतीत सांगितलं.
पोलिसांनी मला कपडे काढायला लावले
दिशाच्या आत्महत्येनंतर रोहनला सोशल मीडियावर धमक्या येत होत्या. "मला हजारो धमकीचे मॅसेज आले होते. लोकांनी मला शिवीगाळ केली. दिशाच्या आत्महत्येची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासात मला माझे कपडेही काढायला लावले असंही रोहन म्हणाला.