मुंबई : 'टोटल धमाल' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक रिक्रिएटेड गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'मुंगडा' या अतिशय लोकप्रिय गाण्याचं नवं रिक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असलं तरीही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मात्र या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही (खुद्द दीदी आणि त्यांच्या बहिणींनी गायलेली गाणी) गायलेली गाणी वापरण्यापूर्वी कधीच कोणी आमच्याकडे विचारणा केली नाही, हे योग्य आहे का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेक्कन क्रोनिकल'शी संवाद साधताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. 'आम्ही जुनी गाणी साकारत असताना ती अतिशय विचारपूर्वकपणे आणि काळजी घेत साकारण्यात यायची. पण, आता मात्र त्याचा अभाव दिसून येत आहे. कोणतंही गाणं अशा प्रकारे रिक्रिएट करणं चुकीचं आहे', असं त्या म्हणाल्या. 'मुंगडा' या गाण्याचे मुळ संगीतकार राजेश रोशन यांनीही याविषयी नाराजी व्यक्त करत नव्या जोमाच्या कलाकारांमध्ये, चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांमध्ये नवी गाणी तयार करण्य़ासाठीच्या आत्मविश्वासाची कमतरता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 


आपल्या आगामी चित्रपटातील गाण्यावरुन होणारा हा वाद पाहता दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी आपली बाजू मांडत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ‘९० च्या दशकात माझ्याही एका चित्रपटातील गाणं असंच रिक्रिएट करण्यात आलं होतं. तेव्हा माझीही परवानगी घेतली गेली नव्हती. विशेष म्हणजे गाणी रिक्रिएट करताना संबंधित म्युझिक कंपनीची परवानगी घ्यावी लागते. कारण, याविषयीचे सारे अधिकारी म्युझिक कंपनीकडे असतात’, असं इंद्र कुमार म्हणाले. 


''१९९७ मध्ये मी दिग्दर्शित केलेल्या ‘इश्क’ चित्रपटातील ‘नींद चुराई मेरी’ हे गाणं रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटात वापरण्यात आलं होतं. तेव्हा माझी परवानगी घेतली गेली नव्हती. मुळात गाण्याचे सर्व अधिकार म्युझिक कंपनीकडे असल्यामुळे त्या गाण्याचं काय करायचं ते सर्वस्वी कंपनीच ठरवते'', ही महत्त्वाची बाब त्यांनी लक्षात आणून दिली. त्यामुळे आता 'मुंगडा'चा वाद पेटला आहे, असं म्हणावं लागेल.