`सिंघम अगेन` फ्लॉप ठरणार? 12 दिवसांची कमाई निराशजनक, दोन दिवस महत्वाचे
अजय देवगनचा `सिंघम अगेन`च्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चित्रपटाला बजेटपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे.
Singham Again Box Office Collection Day 12: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट दिवाळीच्या सणामध्ये प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये 100 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 'सिंघम अगेन' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 200 कोटींची कमाई केली होती.
दरम्यान, 12 दिवसांनंतर चित्रपटाची कमाई निराशजनक होत असल्याचं दिसून येत आहे.
'सिंघम अगेन'ची आतापर्यंतची कमाई
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून 'सिंघम अगेन' चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी 'सिंघम अगेन' चित्रपटाची 10 दिवसांची कमाईचे आकडे सांगितले आहेत. 'सिंघम अगेन' चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 225.30 कोटी रुपये कमाई केलीआहे. सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 11 व्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत 'सिंघम अगेन' चित्रपटाने 229.55 कोटींची कमाई केली आहे.
'सिंघम अगेन' चित्रपटाने 12 व्या दिवशी चार वाजेपर्यंत 1.21 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 230.76 कोटी रुपयांची कमाई केली आहे. परंतु, या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
'सिंघम अगेन' चित्रपटाचे बजेट आणि कमाई
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट 350 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन' चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 323 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आजच्या कमाईसह या चित्रपटाला बजेट काढण्यासाठी 25-30 कोटी रुपयांची गरज आहे.
एखादा चित्रपट हिट जेव्हा होतो जेव्हा तो त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करतो. परंतु, 'भूल भुलैया 3' हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने 'सिंघम अगेन' चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.
14 नोव्हेंबरला कंगुवा चित्रपट प्रदर्शित होणार
अशातच आता 14 नोव्हेंबरला साउथचा कंगुवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'सिंघम अगेन' च्या कमाईमध्ये फरक पडू शकतो.