अक्षय कुमारचा `हा` चित्रपट बनवण्यासाठी दररोज खर्च व्हायचे 4 कोटी, बजेट ऐकून डोळे गरगरतील
या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटींगला एकूण किती खर्च झाला, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
Bade miyan Chote Miyan Total Budget : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचा हा रिमेक असल्याचे बोललं जात आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन व गोविंदा हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. त्याकाळी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. यानंतर आता ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या शूटींगला एकूण किती खर्च झाला, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटासाठी एकूण किती खर्च आला याबद्दल खुलासा केला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दररोज किती खर्च यायचा, याचीही माहिती दिली आहे.
चित्रपटाचे बजेट खूप मोठे
"‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे बजेट खूप मोठे होते. अनेकदा चित्रपटातील कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना बजेटची चिंता कायमच जाणवत असते. पण जेव्हा तुमचा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिला जावा, अशी तुमची इच्छा असते आणि तुम्हाला प्रेक्षकांना काहीतरी वेगळेपण दाखवायचे असते, तेव्हा तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात", असे अली अब्बास जफर म्हणाले.
'एकूण 350 कोटी रुपये खर्च'
"या चित्रपटाच्या शूटींगवेळी अनेक अॅक्शन सीन्सचे प्रत्यक्ष शूटींग करण्यात आले आहे. या सीनचे शूटींग करण्यासाठी 30 ते 40 लाख रुपयांच्या अनेक कार खरेदी करण्यात आल्या होत्या. जेव्हा तुम्ही एखाद्या अॅक्शन सीन्सच्या शूटींगसाठी 30 ते 40 लाखांच्या कारचा वापर करता आणि जर तो स्टंट तुमच्या इच्छेनुसार झाला नाही तर मग त्या रकमेचे थेट नुकसान होते. या चित्रपटात असे अनेक अॅक्शन सीन्स तुम्हाला पाहायला मिळतील. या चित्रपटाच्या एका दिवसाच्या शूटींगचा खर्च 3-4 कोटी रुपये होते. कारण यात वापरण्यात आलेली उपकरणे, हेलिकॉप्टर आणि काही तांत्रिक गोष्टी खूप महाग होत्या. या चित्रपटासाठी एकूण 350 कोटी रुपये खर्च झाला आहे", असेही अली अब्बास जफर यांनी सांगितले.
दरम्यान ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटापूर्वी अली अब्बास जफर यांनी सुलतानसारख्या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.