मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सिनेमाच्या रूपाने पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर येत आहे. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटनांवर आधारीत सिनेमे बनवून एक इतिहास घडवला आहे. ऐतिहासिक सिनेमांची ही परंपरा गेल्या काही वर्षात पुन्हा जपली जात आहे. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे. शिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश मांजरेकर दिग्दर्शित अक्षय कुमारच्या पुढच्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू झालं आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी अक्षयने स्वतः एक खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारचा हा पहिला मराठी चित्रपट आहे.  'वेडात मराठे वीर दौडले सात' असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.


वेडात मराठे वीर दौडले सात हा सिनेमा छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित मराठी काळातील नाटक आहे. जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचा पहिला लूक उघड करताना, अक्षयने या आधी पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका करणं हे एक "मोठं कार्य" म्हटलं होतं आणि ही भूमिका साकारण्याचा सल्ला दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभारही मानले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते,  चित्रपट केवळ कथा किंवा युद्धाचा नारा नाही; हिंदवी स्वराज्याच्या यशाची गाथा आहे आणि गौरवशाली आणि निस्वार्थ बलिदानाची गाथा आहे. वेडात मराठे वीर दौडले सात कुरेशी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित आहे आणि 2023 च्या दिवाळीला मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


सध्या शिवकालीन सिनेमांचा ट्रेंड जोरात सुरू आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्ते शिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज या सिनेमांना मिळालेल्या यशामुळे प्रेक्षकांना शिवकाळातील सिनेमा आवडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच महेश मांजरेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमाच्या घोषणेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.