मुंबई : साधारणपणे बॉलिवूड सेलिब्रिटी वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी देतात. पण हा पायंडा मोडून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा काही वेगळाच बेत आहे. येत्या ९ सप्टेंबरला अभिनेता अक्षय कुमार त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन म्हणून तो कुटुंबासोबत स्वित्झर्लँडला जाण्याचा त्याचा विचार आहे. अक्षय वाढदिवसाच्या वीकेंडला चार दिवस स्वित्झर्लँड ट्रिपला जाणार असल्याचं ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी वाढदिवस असल्याने त्या वीकेंडला अक्षय स्वित्झर्लँडमध्ये असेल. त्याची मुलगी नितारा हीला बर्फ पडताना बघण्याची इच्छा असल्याने त्याने सेलिब्रेशनसाठी स्वित्झर्लँडची निवड केली. व्यग्र कामकाजातूनही आपल्या मुलांना वेळ देण्याला अक्षय नेहमीच प्राधान्य देतो. या परदेश यात्रेपूर्वी खिलाडी कुमारच्या मुंबईच्या घरी एक पूजा असणार आहे. यावेळी आई अरुणा भाटिया, बहिण अल्का, सासू डिंपल कपाडिया आणि मेहुणी रिंकल खन्ना-सरन यांच्यासोबतही वेळ घालवण्यास त्याला मिळणार आहे.


दरम्यान अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याला ‘२.०’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो रजनीकांत आणि अॅमी जॅक्सनसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटसुद्धा पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.