`हा सर्व विनोद वाटतो का?`, पूनम पांडेच्या `त्या` व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला
पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता स्वत: पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे केल्याचे म्हटलं आहे. पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. त्यातच आता अभिनेता आणि बिग बॉस फेम अली गोनी यालाही राग अनावर झाला आहे. त्याने पूनम पांडेवर संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता अली गोनीने नुकतंच ट्विटरवर एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने पूनम पांडे आणि तिच्या टीमला फटकारले आहे. यावेळी अली गोनी म्हणाला, "प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वापरलेले ही पद्धत अतिशय चुकीची होती. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला हा सर्व विनोद वाटतो का? तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण पीआर टीमवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही खरंच आमच्यासह सर्वच मीडिया पोर्टल्सचा विश्वासघात केलाय. आम्हाला तुमची लाज वाटते", असे अली गोनीने म्हटले.
दरम्यान पूनम पांडेने 2 फेब्रुवारीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिच्या निधनाची धक्कादायक बातमी देण्यात आली. "आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. तुम्हाला कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दु:खाच्या काळात, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे", असे त्यात म्हटले होते.
त्यानंतर 3 फेब्रुवारी 2023 ला पूनम पांडेने तिचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती पूर्णपणे व्यवस्थित बसलेली दिसत आहे. "मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरण पावले नाही. दुर्दैवाने, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढताना ज्या हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही. त्यांना काहीच कळत नसल्याने त्या काही करू शकत नव्हत्या. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की इतर कोणत्याही कर्करोगाच्या विपरीत, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करणे शक्य आहे. तुम्हाला फक्त तुमच्या चाचण्या कराव्या लागतील आणि HPV लस घ्यावी लागेल," असे पूनम पांडेने म्हटलं आहे.
तिचा हा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओनंतर पूनम पांडेला खूप ट्रोल केले जात आहे. पूनम पांडेने तिच्या मृत्यूचे खोटे बोलून सोशल मीडियावर माफीही मागितली आहे. पूनमने चाहत्यांची आणि नेटकऱ्यांची माफी मागताना हे सर्व गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी केले, असे म्हटलं आहे.