मुंबई :  ‘लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन’ म्हणण्यासाठी राज्य सरकारने मनोरंजनसृष्टीला ग्रीन सिग्नल दिला आहे... पण अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच चित्रीकरणाला परवानवगी मिळाली आहे. सेटवर निवडक लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे हे सेटवरील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जगात काय घडतंय, आपल्या आजूबाजूला कशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सर्वजण पाहतोय आणि अशा परिस्थितीत एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करणं हे जरा चॅलेंजिंगच आहे. परंतु एका नव्या को-या मराठी सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करुन मराठी सिनेसृष्टीने हे चॅलेंज स्विकारलं आहे.


प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ऍक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे. या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.


ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत...पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव 'झोंबिवली' असे आहे. युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते 'झोंबिवली' हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.


Lawrence D’Cunha हे सिनेमाचे डिओपी आहेत तर साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे लेखक आहेत. एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. सिनेमाचा नविन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार हे नक्की. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये प्रेक्षकांना मिळेल.