Amitabh Bachchan Touches Feet Of This Man On Stage: बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी नाग अश्वीन यांच्या 'कालकी 2898 एडी' या चित्रपटाचं पहिलं तिकीट विकत घेतलं आहे. मुंबईमध्ये बुधवारी या चित्रपटाच्या प्री-रिलीजचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अमिताभ यांच्यासहीत अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता प्रभास, दिग्दर्शक नाग अश्वीन आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. गरोदर असलेल्या दीपिकाने या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने तिची चांगलीच चर्चा उपस्थितांमध्ये होती. मात्र कार्यक्रमादरम्यान अमिताभ यांच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 


अमिताभ कोणाच्या पाया पडले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कालकी 2898 एडी' या चित्रपटाचं पहिलं तिकीट अमिताभ यांनी 500 रुपयांना सर्वांसमोरच विकत घेतलं. या चित्रपटाचे निर्माते असलेल्या सी. आसवानी दत्त यांनी अमिताभ यांना स्टेजवरच हे तिकीट अमिताभ यांना दिलं. अमिताभ यांनीही चित्रपटाचं पहिलं तिकीट मिळाल्यानंतर 500 रुपयांची नोट निर्माते असलेल्या दत्त यांच्या हातात टेकवली. अमिताभ यांनी या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान निर्मात्यांनी कलाकारांना फार मोठ्याप्रमाणात पाठिंबा दिल्याचं सांगितलं. अमिताभ एवढ्यावरच शांबले नाही तर ते सी. आसवानी दत्त यांच्या पायाही पडले. अमिताभ सी. आसवानी दत्त यांच्या पायाशी वाकले असता ते काही पावलं मागे सरकले आणि त्यांनी अमिताभ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते स्वत: अमिताभ यांच्या पायाशी वाकल्याचं पाहायला मिळालं.


त्या व्यक्तीचा साधेपणा चर्चेत


आपण असे सी. आसवानी दत्त यांच्या पाया का पडलो यासंदर्भातील खुलासा अमिताभ यांनी कार्यक्रमात निर्मात्यांबद्दलच्या भावना व्यक्त करताना केला. अमिताभ यांनी सी. आसवानी दत्त यांचा उल्लेख, "मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी ते सर्वात साधे आणि विनम्र व्यक्ती आहेत," असा केला. सी. आसवानी दत्त यांच्या साधेपणाचा कल्पना त्यांच्या पेहरावावरुनच येत होती. ट्राउजर पँट, पिवळं हाफ बाह्यांचं शर्ट अन् पायात स्लीपर असा सी. आसवानी दत्त यांचा पेहराव या कार्यक्रमात होता.



(फोटो सौजन्य : योगेन शाहा)


अमिताभ यांनी पाया पडायचं कारणही सांगितलं


"मी जेव्हा जेव्हा शुटींगसाठी सेटवर जायचो तेव्हा ते पहिली व्यक्ती असायचे जे मला भेटायचे. ते मला विमानतळावर रिसीव्ह करण्यासाठीही आले होते. आम्हाला त्रास होईल असं काही करण्यास सांगितल्यास ते आवर्जून म्हणायचे की त्यांना (कलाकारांना) त्रास होईल असं काही त्यांच्याकडून करुन घेऊ नका. ते अनेकदा सांगायचे की त्यांना हे स्टंट करायला लावू नका. तसेच सेटवर सर्व सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे ना याची ते अनेकदा खातरजमा करुन घ्यायचे. कोणीही कलाकारांबद्दल एवढा विचार करत नाही. यासाठी तुमचे फार आभार सर," असं अमिताभ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. अमिताभ सी. आसवानी दत्त यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



काय आहे या चित्रपटामध्ये?


'कालकी 2898 एडी'चा ट्रेलर यापूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रिपटामध्ये अमिताभ, दीपिका, प्रभास यांच्याबरोबरच अभिनेते कमल हसन, दिशा पटानी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महाभारताच्या थीमवर आधारित हा चित्रपट भविष्याबद्दल भाष्य करणार असल्याचा अंदाज टीझरवरुन बांधला जात आहे. या चित्रपटाचं कथानक काशीमध्ये घडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट 600 कोटी रुपये इतकं आहे.