मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या म्हणजे रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत 'स्वयंम संचारबंदी' करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यांच्या या निर्णयाला सर्वच स्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मोदींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उद्या  जनता कर्फ्युचं पालन करण्याचं आवाहन समस्त देशातील नागरिकांना केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की ,'उद्या संपूर्ण देशात जनता कर्फ्यु असणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. २२ रोजी संध्याकाळी पाच वाजता घराच्या खिडकीत, दरवाज्यात आणि गंच्चीवर जाऊन टाळ्या, घंटा, शंख वाजवून कठिण परिस्थितीमध्येही स्वत:च्या जीवाची पर्वा न करणाऱ्या निस्वार्थी लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे.' देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 



कोरोना व्हायरसचा (COVID 19) सामना करण्यासाठी येत्या २२ मार्चला देशातील नागरिकांनी जनता कर्फ्युचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना केले. जनता कर्फ्यु लागू झाल्यानंतर नागरिकांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरातून बाहेर पडू नये.  हा कर्फ्यु म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लादून घेण्यात आलेला कर्फ्यु असेल. हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 


आताच्या माहितीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २९८वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३९ रुग्ण हे परदेशातील आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशभरातून एकूण ५२  कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे  कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकलेले २३ रुग्ण योग्य उपचारानंतर बरे झाले आहेत. तर चार रुग्ण या धोकादायक व्हायरसमुळे मृत्यू पावले आहेत.