मुंबई : झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका आज घराघरात पाहिली जाते. अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सध्या अत्युच्च क्षणावर उभी आहे. दिवसेंदिवस या मालिकेत आता पुढे काय होणार या सबंधिची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत चालली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजी पंत आणि त्यांच्यासोबत कुटील कारस्थान रचणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फर्मावली आहे. लवकरच अनाजींना हत्तीच्या पायी देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासाला फितुरीचा शाप आहे. याच फितुरीला चाप बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठवल्या होत्या. पण शिवरायांच्या पुत्राविरोधात बंड करून उठले ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख असलेले अनाजी पंत. शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अनाजी संभाजी महाराजांविरोधात फितुर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली.


शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा संभाजी महाराज छावा होते. तेवढेच प्रतापी...तेवढेच शूर..तेवढेच पराक्रमी..त्यामुळे वडिलांनी आखून दिलेल्या महामार्गावर चालताना त्यांचे विचार आणि आचार संभाजी महाराजांनीही अंमलात आणले. स्वराज्याचा तुकडा पाडू इच्छिणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा फर्मावली ती म्हणजे देहांताची शिक्षा.


हाच सगळा इतिहास स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून पुन्हा एकदा जिवंत होऊन प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. इतिहासातल्या या प्रसंगाची अत्यंत रोमहर्षक मांडणी या मालिकेत करण्यात आली आहे.