`माझी सासू म्हणजे लग्नांची....`, राजेशाही थाटात लग्न झाल्यानंतर राधिका मर्चंट काय म्हणते पाहा?
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: राधिका मर्चंटने (Radhika Merchant) आपल्या सासू नीता अंबानी (Nita Ambani) कशाप्रकारे लग्नाच्या सीईओ आहेत हे सांगताना त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगात चर्चा असलेल्या अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. मुंबईत दोघेही विवाहबंधनात अडकले. या लग्नाला फक्त देश नाही तर जगभराती दिग्गजांनी उपस्थिती लावली. अत्यंत राजेशाही थाटात झालेलं हे लग्न एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते. लग्नामध्ये आलेले पाहुणे, सजावट यासाठी अनेक लोक राबत होते. पण या सर्वांचं नेतृत्व नीता अंबानी करत होत्या असं दिसत आहे. नुकतंच राधिका मर्चंटने (Radhika Merchant) Vogue शी बोलताना कशाप्रकारे आपली सासू ही लग्नाची सीईओ आहे याबद्दल सांगितलं. तसंच आपल्यासाठी त्या कशाप्रकारे आदर्शवत आहे याबद्दलही सांगितलं.
राधिका मर्चंटने काय सांगितलं?
"मी असं सांगेन की, माझी सासू ही लग्नांची सीईओ आहे. नीता अंबानी यांची कटिबद्धता आणि व्हिजन यांच्यामुळेच अशा प्रकारचं सेलिब्रेशन करु शकलो," असं राधिका मर्चंटने सांगितलं. या लग्नाचं सर्व प्लॅनिंग ईशा अंबानी आणि श्लोक मेहता यांनी केल्याचंही तिने सांगितलं. लग्नात काम करण्यासाठी त्यांनी घरातील स्टाफ तसंच अनेक इव्हेंट मॅनेजमेंटचे कर्मचारी यांना ठेवलं होतं. हे सर्वजण सलग आठवडाभर सुरु असलेल्या सेलिब्रेशनसाठी दिवसरात्र मेहनत घेत होते.
राधिकाने यावेळी लग्नाचा शनिवार व रविवार हेतूपूर्वक निवडल्याची माहितीही दिली. "आमच्या कौटुंबिक पुजारींच्या सल्ल्यानुसार 12, 13 आणि 14 जुलै या तारखा निवडल्या होत्या. त्यांनी माझ्या आणि अनंतच्या दोन्ही पत्रिकांमधील शुभ ज्योतिषशास्त्रीय अंकांच्या आधारे या तारखा निवडल्या होत्या," असं राधिकाने सांगितलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला. या लग्नाला अनेक सेलिब्रिटी, जागतिक नेते, राजकारणी उपस्थित होते. 15 जुलैला तीन दिवसीय विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाआधी दोन प्री-वेडिंग समारंभ झाले. पहिला सोहळा गुजरातमधील जामनगर येथे झाला आणि दुसरा इटलीतील क्रूझवर पार पडला. दोन्ही समारंभांना असंख्य पाहुणे आणि जागतिक नेते उपस्थित होते.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून जवळपास आठवडाभर या विवाहातील वेगवेगळे कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडले. अंबानींच्या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील गायक जस्टीन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांजबरोबरच अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी मनोरंजनसृष्टीपर्यंत जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 12 जून रोजी राधिका आणि अनंत यांनी सप्तपदी घेतल्या. मात्र या लग्नाची संपूर्ण तयारी, सेलिब्रिटींना परफॉर्मन्ससाठी दिलेलं मानधन आणि एकंदरित तयारीच्या खर्चाची आकडेवारी नुकतीच समोर आली. एकूण संपत्ती 10 लाख 28 हजार 544 कोटी रुपये असलेल्या अंबानी कुटुंबाने धाटक्या लेकाच्या लग्नासाठी तब्बल 5 हजार कोटी रुपये खर्च केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.