Anant Ambani Radhika Merchant Wedding : देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडींग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. 1 मार्चपासून 3 मार्चदरम्यान पार पडलेल्या या भव्य सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाकडून विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळींना आमंत्रण देण्यात आले होते. यात बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, जगप्रसिद्ध गायिका रिहाना यांसह बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकार, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित विवाहसोहळ्याची संपूर्ण माहिती नुकतीच समोर आली आहे. यात अनंत आणि राधिकाच्या लग्नात कोण कोण उपस्थित असणार, त्यांच्या लग्नाचे ठिकाण काय असणार याचीही माहिती समोर आली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांचा विवाहसोहळा 12 मे 2024 रोजी पार पडेल. पण अद्याप अंबानी कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.


भारतातच होणार सप्तपदी?


तसेच काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळा लंडनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा अबुदाबीमध्ये असणार आहे, अशी माहिती इंडिया टुडेने दिली होती. त्यानंतर आता सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा परदेशात नव्हे तर भारतात होणार आहे. विशेष म्हणजे ते दोघेही मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहेत. 



'हे' कलाकार होणार सहभागी


या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांसह परदेशातील विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय असलेल्या दिग्गज व्यक्तींना आमंत्रण देण्यात येणार आहे. यात अनेक बिझनेसमॅन, राजकीय व्यक्तींचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली, अनुष्का शर्मा, विक्की कौशल, कटरीना कैफ यांसह कित्येक कलाकार सहभागी असतील. यासोबतच बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टेफेन स्च्वार्ज्मन, बॉब इगेर, इवांका ट्रंप हे दिग्गज व्यक्तीही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावू शकतात, असे म्हटलं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.