प्रसिद्ध गायकाच्या 3 वर्षाच्या मुलीला रात्रभर राहावं लागलं उपाशी; हॉटेलमध्ये गायकासोबत घडला धक्कादायक प्रकार
सेलेब्सचं आयुष्य खूप छान असतं असं सर्वसामान्यांना वाटतं पण तसं नाही...
मुंबई : सेलेब्सचं आयुष्य खूप छान असतं असं सर्वसामान्यांना वाटतं. कारण आरामापासून पैसा आणि प्रसिद्धीपर्यंत सगळं काही त्यांच्या आयुष्यात आहे. यामुळेच प्रत्येकाला सेलेब्ससारखं आयुष्य जगायचं असतं. पण सेलेब्सचं आयुष्यही दिसतं तितकं सोपं नसतं असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
कधी-कधी या लोकांना समस्यांनाही सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल बोसने सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, ऑर्डर केलेल्या एका केळ्यासाठी त्याने हजारोंचं बिल भरलं आहे.
आता गायक अंकित तिवारीसोबत 5 स्टार हॉटेलमध्ये असाच गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे. अंकित तिवारीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने दिल्लीतील एका 5 स्टारमध्ये आपल्याला कशी वाईट वागणूक दिली गेली हे सांगितलं आहे. एवढंच नाही तर हॉटेल कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या मुलीला रात्रभर उपाशी राहावं लागलं. खरं तर अंकित कुटुंबासोबत हरिद्वारला गेला होता. त्यानंतर तो एक दिवस दिल्लीत राहिला. त्यानंतर त्यांना वृंदावनला जावं लागलं.
यादरम्यान तो रॉयल प्लाझा हॉटेलमध्ये आपली मुलगी आणि पत्नीसोबत थांबला होता. जिथे चेक-इन करण्यासाठी सुमारे 45 मिनिटं लागली. त्यानंतर तो खोलीत गेला, आणि जेवणाची ऑर्डर केली. मात्र तीन तास उलटूनही अन्न ना पाणी आलं. यावेळी अंकितने सांगितलं की, त्याला तीन वर्षांची मुलगी आहे. तिच्यासाठी त्याने दुधाची ऑर्डर दिली होती. पण ती त्याला दिली नाही. व्हिडिओमध्ये अंकितसोबत आणखी लोकं दिसत आहेत. अंकितच्या म्हणण्यानुसार हॉटेल मॅनेजमेंटबरोबर जेव्हा या संबधित तक्रार केली गेली. तेव्हा त्यांनी त्याला बाउंसर्सपर्यंतची धमकी दिली.