ब्रिटनच्या संसदेत अनुराधा पौडवाल यांचा सन्मान
इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने हा सोहळा ब्रिटनच्या संसद सभागृहात पार पडला.
नवी दिल्ली: ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ब्रिटनच्या संसदेने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल सन्मानित केले आहे. इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने हा सोहळा ब्रिटनच्या संसद सभागृहात पार पडला. या सोहळ्याला ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनेक भाषांतून १५०हून अधिक गाणी गायली
अनुराधा पौडवाल यांनी आजवरच्या कारकीर्दीत भारतातील अनेक भाषांमधून सुमारे १५००हून अधिक गिते गायली आहेत. हा पुरस्कार मिळाल्यावर भावना व्यक्त करताना अनुराधा म्हणाल्या, या संसदेला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. असा संसदेत पुरस्कार मिळणे ही प्रचंड आनंदाची बाब आहे. मी गाण्यावर मनापासून प्रेम केले. असंख्य श्रोत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच सर्व काही शक्य होऊ शकले. मी जे काही थोडेफार कार्य केले आहे. ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. विशेष म्हणजे त्याची दखलही घेतली जात आहे, हे या पुरस्कारातून दिसत असल्याचेही अनुराधा यांनी सांगितले.
समाजाप्रती जबाबदारी स्वीकारावी
दरम्यान, अनुराधा यांनी शहीदांच्या आणि गरीबांच्या कुटुंबियांसाठीही मदतीचे कार्य केले आहे. या कार्याबद्दल बोलताना त्या म्हणतात 'हे कार्य मी केवळ समाजाचे देणे म्हणून करत नाही. मला ते आवडते म्हणून मनापासून करते. या कार्यबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. पण, समाजाबद्दल आपली काही जबाबदारी असते. या सामाजिक कार्यातून त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे मी मानते', अशी भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली.