मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या सुपरहिट 'मिस्टर इंडिया'  Mr. India चित्रपटातून खलनायक 'मोगॅम्बो'ने लहान असताना अनेकांना घाबरवलं आहे. 'मोगॅम्बो' साकारणाऱ्या अमरिश पुरी यांच्या मोठे डोळे, दमदार आवाजाने या भूमिकेला आणखीनच घाबरवणारं बनवलं होतं. अमरिश पुरी यांनी, त्यांच्या जबरदस्त अभिनयाने 'मोगॅम्बो' या व्यक्तीरेखेला कलाविश्वात 'अमर' बनवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरिश पुरी यांच्या जबरदस्त भूमिकेनंतर, 'मोगॅम्बो'च्या भूमिकेत इतर कोण्या कलाकारला पाहण्याची कल्पनाही करणं कठीण ठरु शकतं. पण 'मोगॅम्बो'च्या भूमिकेसाठी 'मिस्टर इंडिया'चे दिग्दर्शक शेखर कपूर यांची पहिली पसंती अमरिश पुरी नाही, तर कोणीतरी दुसराच कलाकार होता. 


असं बोललं जात की, 'मोगॅम्बो' या खलनायकाच्या भूमिकेसाठी शेखर कपूर यांची पहिली पसंती अनुपम खेर यांना होती. 'मिस्टर इंडिया'चे दिग्दर्शक शेखर कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांनी 'मोगॅम्बो'च्या रोलसाठी अनुपम खेर याचं नाव निश्चित केलं होतं. ही गोष्ट अनुपम खेर यांनीच एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. 


'मिस्टर इंडिया'मध्ये 'मोगॅम्बो'च्या रोलसाठी मला ऑफर करण्यात आली होती. पण एक-दोन महिन्यांनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला अमरिश पुरी यांच्याशी रिप्लेस केल्याचं, अनुपम खेर यांनी सांगितलं. अनुपम खेर यांच्या जागी, अमरिष पुरी यांना चित्रपटात घेण्याबाबत, अभिनेते अनिल कपूर यांनी सुचवलं असल्याचं बोललं जातं. 


अमरिश पुरी यांनी 'मोगॅम्बो' भूमिका इतक्या अचूक, जबरदस्तरित्या साकारली की, 'मोगॅम्बो' बॉलिवूडमध्ये सर्वात आठवणीत राहणारा, संस्मरणीय खलनायक ठरला. 'मोगॅम्बो खुश हुआ' हा डायलॉग तर आज कित्येक वर्षांनंतरही प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर 'मिस्टर इंडिया' चित्रपट बॉलिवूडमधल्या सर्वात क्लासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. 


अमरिश पुरी यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये २००हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी हिंदीशिवाय, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि इंग्रजी चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. अमरिश पुरी बॉलिवूडच्या सर्वोत्तम खलनायकांपैकी एक म्हणून आजही आठवणीत आहेत.