भूषण प्रधान करतोय `या` अभिनेत्रीला डेट? अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती
मराठी सिनेसृष्टीतील भूषण प्रधान सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर अनुषा दांडेकरनेही आत्तापर्यंत हिंदीसोबतच अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे.
मुंबई : सध्या मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहेत. तर काहीजण लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता एका सेलिब्रिटी जोडीचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर आहे. मराठी सिनेसृष्टीतील भूषण प्रधान सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर अनुषा दांडेकरनेही आत्तापर्यंत हिंदीसोबतच अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर या जोडीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहेत. याआधी अनेकदा अनुषाने भूषणसोबत फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमागचं सत्य अखेर समोर आलं आहे.
जुनं फर्निचर या चित्रपटामुळे भूषण सध्या चर्चत आहे. या सिनेमात भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर व्यतिरिक्त महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, अनुषा दांडेकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जूनं फर्निचर हा सिनेमा येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकतीच भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर ही जोडी गुढीपाडव्याच्या शोभयात्रेत सहभागी होताना दिसली आहे. गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सिनेमाचं प्रमोशन करताना ही जोडी सहभागी झाली होती. यावेळी भूषण आणि अनुषा मराठमोळ्या अंदाजात दिसले.
नुकतंच अनुषाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर दिसत आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, 'अवनी व अभयला या नव्या वर्षात भेटा.' शेअर केलेल्या फोटोत भूषण पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर अनुषा महाराष्ट्रीयन अंदाजात दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची नऊवारी परिधान केली होती. या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लवकरच भूषण आणि अनुषाचा 'जुनं फर्निचर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद याची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा २६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.