मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या खासगी आयुष्याविषयी चर्चेत होता. आता अर्जुन एका वादामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. एका इंटरटेन्मेंट कंपनीने अर्जुनविरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला आहे. एक कोटी रूपयांच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने कंपनीकडून अर्जुनविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. कंपनीकडून तीन महिन्यांत कर्ज परत करतो असं सांगत त्याने व्याजावर पैसे घेतले होते. मुदत संपूनही कर्ज परत न केल्याने कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने वायटी इंटरटेन्मेंट कंपनीकडून 1 कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. 90 दिवसांच्या आत 12 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम परत करण्याच्या अटीवर हे कर्ज घेतलं होतं. अर्जुनने अटीप्रमाणे पैशाची परतफेड केली नसल्याचा आरोप कंपनीने केला आहे. परंतु अर्जुनने या आरोपांचं खंडण करत संपूर्ण पैसे परत केल्याचं सांगितलं. अर्जुनकडून पोस्ट डेटेड चेक देण्यात आला होता मात्र 23 ऑगस्ट 2018 साली खात्यात पैसे नसल्यामुळे चेक बाउंस झाल्याचा आरोप कंपनीने केला आहे. 


8 ऑक्टोबर 2018 साली कलम 138 द्वारा अर्जुनला कायदेशीर नोटीस पाठवून 14 दिवसांच्या आत व्याजासहित कर्जाची रक्कम फेडण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु त्याने रक्कम परत न करता नोटीशीवरही कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचं कंपनीने सांगितलंय. त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी त्याच्याविरूद्ध अंधेरी कोर्टात खटला दाखल आला. त्यानंतर त्याने 22 नोव्हेंबरला 7.5 लाख रूपये दिले, परंतु संपूर्ण पैसे परत न केल्याने आता पुन्हा कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात 1 करोड 50 हजार रूपयांच्या परतफेडीसाठी खटला दाखल केला आहे.