प्रदर्शनापूर्वीच बहुचर्चित Chhapaakवर लक्ष्मी अग्रवाल नाराज?
तिच्याच जीवनातील काही प्रसंगांच्या आधारे या चित्रपटाचं कथानक साकारलं आहे
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिका असणारा Chhapaak 'छपाक' नव्या वर्षात प्रेक्षकांना एका अशा वास्तविकतेसमोर उभं करणार आहे, जो आपल्या समाजाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. महिलांवर होणारे ऍसिड हल्ले, त्यातून बचावलेल्या महिला आणि त्यांचा संघर्ष या साऱ्याला मेघना गुलजार यांनी रुपेरी पडद्यावर साकारलं आहे.
ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि अनेकांसाठी आदर्श ठरलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्याच जीवनातील काही प्रसंगांवर या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. लक्ष्मीच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका पदुकोण झळकणार असल्यामुळे या चित्रपचटासाठीचं कुतूहल शिगेला पोहोचलं आहे. यातच आता चित्रपटाविषयी एक भुवया उंचावणारी बाब समोर आली आहे.
सूत्रांचा हवाला देत माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लक्ष्मी अग्रवाल या चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. लक्ष्मी या चित्रपटाच्या निमित्ताने तिला देण्यात आलेल्या मानधनाविषयी नाराजी व्यक्त केली असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाच्या कॉपीराईट अर्थात स्वामित्व हक्कांसाठी लक्ष्मीला १३ लाख रुपये देण्यात आले होते.
Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच
लक्ष्मीला ज्यावेळी या चित्रपचटासाठीच्या मानधनाची रक्कम देण्यात आली, तेव्हा ती आनंदात होती. पण, आता मात्र ती जास्त पैसे मागत असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या या मागणीमुळेच chhapaakची टीम आणि तिच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं कळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच डोकं वर काढलेल्या या वादाविषयी चित्रपटाशी संलग्न कोणत्याच व्यक्तीकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, कलावर्तुळात त्याविषयीच्या चर्चांनी मात्र जोर धरला आहे. तेव्हा आता या प्रकरणाला मिळणाऱ्या वळणाकडे साऱ्यांचं लक्ष असेल असं म्हणायला हकत नाही.