गर्दीत अडकलेल्या आशा भोसलेंच्या मदतीला धावल्या स्मृती इराणी
मोदींच्या शपथविधीसाठी आलेल्या आशा भोसले गर्दीत अडकल्या.
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनमध्ये गुरुवारी ३० मे रोजी मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदींसह इतर मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी नेत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारही सहभागी झाले होते. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही शपथविधी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. परंतु शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या मोठ्या गर्दीमध्ये त्या अडकल्या. आशा भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली.
'मी अनेकांकडे गर्दीतून बाहेर येण्यासाठी मदत मागत होती परंतु कोणीही आलं नाही. त्यावेळी स्मृती इराणी यांनी पुढे येत माझी मदत केली.' असं ट्विट करत आशा भोसले यांनी शपथविधि सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.
आशा भोसले यांनी स्मृती इराणी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत 'स्मृतीने केलेल्या मदतीमुळे मी सुखरुपपणे घरी पोहचू शकली. दुसऱ्यांची मदत करण्याची, त्यांची काळजी करण्याची भावना स्मृतीमध्ये आहे आणि त्यामुळेच ती निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाली' असं आशा भोसले यांनी म्हटलंय.
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला. ४३ वर्षीय स्मृती इराणी यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रीपरिषदेत स्मृती इराणी सर्वात कमी वयाच्या मंत्री ठरल्या आहेत.
अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा ५५ हजार १२० मतांनी पराभव केला होता.