कोण शाहरुख खान? विचारताच मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता फोन आला अन्...
Shahrukh Khan : शाहरुख आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीवरुन वाद उफाळला होता मात्र सेन्सॉरने कात्री लावत बदल केलेत
Pathan Movie Protest : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. शाहरुख आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आधी बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीवरुन वाद उफाळला होता. त्यानंतर चित्रपटातील काही दृष्ये आणि डायलॉगवरुन पुन्हा वाद सुरु झाला. यानंतर सेन्सॉर बोर्डाने मध्यस्थी करत काही काटछाट केली आहे. मात्र तरीही चित्रपटाला विरोध सुरुच आहे. अशातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी शाहरुखला त्याच्या चित्रपटाबाबत आश्वस्त केले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्यांना पहाटे 2 वाजता फोन केला होता असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शाहरुखने त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विरोधाबद्दल चिंता व्यक्त केली. यावर शर्मा यांनी शाहरुखला आश्वासन दिले की, 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी राज्य सरकार घेईल.
"बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानेने मला पहाटे 2 वाजता फोन केला आणि आम्ही बोललो. त्याने गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मी त्याला आश्वासन दिले की कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्ही चौकशी करू आणि अशी कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेऊ," असे शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कुठून सुरु झाले प्रकरण?
"शाहरुख खान कोण आहे?" असे हेमंत शर्मा यांनी विचारल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट केले. गुवाहाटीमध्ये पठाण चित्रपटाच्या विरोधात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले होते. त्यावेळी बोलताना "शाहरुख खान कोण आहे? मला त्याच्याबद्दल किंवा 'पठाण' चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही," असे शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर पत्रकारांनी शाहरुख बॉलिवूडमधील सुपरस्टार असल्याचे सांगितले. त्यावर, "राज्यातील जनतेने आसामी चित्रपटांची चिंता करावी, बॉलिवूडची नाही. मला शाहरुख खानचा कोणताही फोन आला नाही आणि त्याने विनंती केल्यास या प्रकरणात लक्ष घातले जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आंदोलकावर कारवाई केली जाईल," असे शर्मा म्हणाले होते.