`माहिती होतं तर सुशांतला मदत का नाही केली?` गायकाचा मुकेश भट्टना सवाल
यशाच्या शिखरावर असताना त्याच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण कलाविश्व हादरुन गेलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अशा अकाली एक्झिटने अनेकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. यशाच्या शिखरावर असताना त्याच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण कलाविश्व हादरुन गेलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
सुशांतच्या जाण्याने अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला असून आपल्या भावना व्यक्त करत, विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडचे दिग्गज निर्माते मुकेश भट्ट यांनी सुशांतच्या निधनावर, सुशांत आधीपासूनच डिस्टर्ब होता, सुशांत असं करेल याची कल्पना असल्याची धक्कादायक प्रतिक्रिया दिली. मुकेश भट्ट यांच्या या प्रतिक्रियेनंतर, भाजप नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्यावर टीका केली आहे.
बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांची प्रतिक्रिया अतिशय संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. 'सुशांत अशा कठीण परिस्थितीत आहे याची मुकेश भट्ट यांना जाणीव होती. त्यांनी व्यावसायिक कारणास्तव सुशांतला 'सडक 2', 'आशिकी 2' चित्रपटात काम दिलं नाही, ही बाब समजण्याजोगी आहे. परंतु मुकेश भट्ट यांना सुशांतबाबत माहिती असूनही कोणतीही भूमिका घेतली नाही, त्याला या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी वडिलांच्या नात्याने कोणतीच पाऊलं उचलली नाही, त्याला मदत केली नाही ही बाब लज्जास्पद असल्याचं,' सुप्रियो यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
'सुशांत असं करेल याची कल्पना होती', दिग्गज निर्मात्याची धक्कादायक प्रतिक्रिया
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत मुकेश भट्ट यांनी सांगितलं की, 'सुशांत आणि मी 'आशिकी 2' आणि 'सडक 2' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याबाबत बोलण्यासाठी जवळपास दीड वर्षांपूर्वी भेटलो होतो. चित्रपटाविषयी बोलताना सुशांत खूप डिस्टर्ब वाटत होता. त्याचवेळी त्याच्यासोबत काही चुकीचं घडत असल्याची जाणीव मला झाली होती'