व्हिडिओ : `बारायण`चं अँथम साँग पाहिलंत का?
अतिशय बोलका चेहरा आणि चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन अनुराग वरळीकर हा अभिनेता `बारायण` या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मुंबई : अतिशय बोलका चेहरा आणि चेहऱ्यावर निरागस भाव घेऊन अनुराग वरळीकर हा अभिनेता 'बारायण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक संदेश न देता पालकांसह संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं 'अँथम साँग' नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. त्यावरून या सिनेमाची आणि त्याच्या आशयाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.
कलाकारांची फौज
दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या 'ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'च्या 'बारायण' या मराठी चित्रपटात अनुराग वरळीकर याच्यासह बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'बारायण'ची कथा दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा-संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केलंय. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलंय... तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलंय.