मुंबई : अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या बोलक्या पोस्टर वरून हा चित्रपट शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हा चित्रपट नुसता भाष्य करणारा नसून पोस्टरमधला 'विशालकोन', शिक्षणाचा एक वेगळा 'अँगल'  सुद्धा दाखवतोय. हा विशालकोन, पेन्सिल आणि कोनमापक यांचं बनलेलं धनुष्य कुठला वेध घेतयं हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पोस्टरमधील आलेख पेपरवर, वेध घेणाऱ्या धनुष्याबरोबर असणारे, ओरिगामीचे कागद आणि रंगीत पक्षी, किचकट वाटणाऱ्या शिक्षणात कलात्मकता आणू पाहतायेत का? शिवाय कोणत्याही शब्दकोशात न सापडणारा 'बारायण' हा शब्द  शिक्षणातल्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याचा - बारावीचा वेध तर घेत नसेल ना ?  किंबहुना बारावीचा टप्पा खरंच इतका महत्त्वाचा आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी प्रेक्षकांमध्ये अफाट उत्सुकता निर्माण झाली आहे, अगदी रिझल्टच्या आधी होते ना तशी! तसंच या चित्रपटात कलाकार कोण कोण असणार आहेत ही उत्सुकता देखील कमालीची ताणली गेलीये.


दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या 'ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'चा हा चित्रपट नावाप्रमाणेच हटके असणार. पोस्टरमध्ये अतिशय कल्पकतेने मांडलेला चित्रपटाचा आशय, एका उत्तम कलाकृतीची ग्वाही देत आहे.एकंदरीतच मराठी सिनेसृष्टीला उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांचा नजराणा लाभलेला आहे. नुकताच मराठी चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि गोव्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ मध्ये 'इंडियन पॅनोरमा' त,उल्लेखनीय संख्येने निवड झालेले मराठी चित्रपट, मराठी सिनेसृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित करतात. याच सिनेसृष्टीतील 'बारायण' हा एक उल्लेखनीय चित्रपट ठरेल.



पोस्टरमधील 'बारा' ला 'स्पेशल ट्रीटमेंट' देणारा ‘बारायण’ येत्या १२ जानेवारीला म्हणजे, तरुणांसाठी आदर्श असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला, राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि सर्वच वेधक प्रश्नांची अचूक उत्तरं प्रेक्षकांना मिळतील !