मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सहभाग असणारा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमाच्या खास भागाचं नुकतच प्रसारण करण्यात आलं. शंभरहून अधिक राष्ट्रांमध्ये एकाच वेळी दाखवण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसादही मिळाला.  रान वाटांवर अगदी सराईताप्रमाणे वावरणाऱ्या बेअर ग्रिल्सच्या साथीने मोदींची ही सफर प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच कुतूहल जागवून गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमाचा खास भाग प्रदर्शित झाल्यानंतर याच कुतूहलाचं रुपांतर हे विनोदी मीम्सने घेतलं. उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये मोदींसह बेअर एका सफरीला निघाला होता. या प्रवासादरम्यान, त्याने मोदींच्या बालपणाविषयी, त्यांच्या कामाविषयी आणि एक पंतप्रधान म्हणून असणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 


बेअरचे प्रश्न आणि त्याला पंतप्रधानांची उत्तरं अशा रुपात हा भाग पार पडला. ज्यानंतर सोशल मीडियावर अपेक्षित चित्र पाहायला मिळालं. या भागातील काही क्षण आणि दृश्य टीपत त्याचे अफलातून आणि विनोदी मीम्स अनेक पेजवरुन शेअर करण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी मीम्स ठरले ते म्हणजे बेअर आणि मोदींमधील हिंदी- इंग्रजी संभाषणाविषयीचे. 










बेअरच्या प्रश्नांना मोदींनी हिंदीतून दिलेली उत्तरं पाहता आता यावर बेअरची काय प्रतिक्रिया असेल असाच प्रश्न प्रेक्षकांच्याही मनात घर करुन गेला. सोशल मीडियावर त्यावरच भाष्य करणारे मीम्स पाहायला मिळाले. ज्यासाठी बॉलिवूड चित्रपटांमधील विनोदी दृश्यांचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. कोण म्हणतंय हे 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' होतं? हे तर होतं, 'वन की बात'.... असं म्हणत काही ट्विट करण्यात आले. तर, कोणी यामधून आपच्या अरविंद केजरीवाल यांनाही मागे ठेवलं नाही.