Salman Khan once planned to Purchase Mannat : बॉलिवूड म्हटलं, की अनेकदा काही नावं आणि काही सेलिब्रिटींची चेहरे ओघाओघानं समोर येतात. सलमान खान आणि (Shahrukh Khan) शाहरुख खान, ही त्यातलीच काही नावं. जवळपास एकाच वेळी हिंदी कलाजगतामध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या दोन अभिनेत्यांनी वयाची कैक वर्ष चित्रपटसृष्टीत योगदान दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख आणि सलमाननं खऱ्या अर्थानं 90 च्या दशकाचा काळ गाजवला. इतकंच नव्हे, तर वेळोवेळी एकमेकांच्या कामाची प्रशंसाही केली. कारकिर्दीतील आव्हानात्मक काळ, प्रसिद्धीचा काळ असे सर्व दिवस पाहिलेले हे दोन्ही कलाकार एकमेकांचे अतिशय चांगले मित्र असून, आश्चर्याची बाब म्हणजे ते मुंबईतील एकाच उच्चभ्रू परिसरात वास्तव्यासही आहेत. 


सलमान खान मुंबईच्या वांद्रे येथील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मध्ये राहतो, तर शाहरुख तिथंच काही अंतरावर असणाऱ्या 'मन्नत' नावाच्या आलिशान बंगल्यात राहतो. ही झाली सद्यस्थिती, पण हाच सलमान सर्व गोष्टी सुरळीत सुरू राहिल्या असत्या, तर आजच्या क्षणाला मन्नत बंगल्याचा मालक असता, ही बाब माहितीये का? खुद्द सलमाननंच गप्पांच्या ओघात एका मुलाखतीमध्ये याबाबतचा खुलासा केला. 


अशी कोणती एक गोष्ट आहे, जी शाहरुखकडे आहे आणि तुमच्याकडे नाही? असा प्रश्न सलमानला एका मुलाखतीदरम्यान करण्यात आला होता. या प्रश्नाचच उत्तर देताना, 'त्याचा बंगला' असं सलमान तातडीनं म्हणाला. भाईजानच्या या उत्तरानं अनेकांचेच डोळे चमकले. ज्यानंतर सलमाननं बंगल्याच्या खरेदीच्या वेळचा प्रसंग सर्वांपुढे मांडला. 


हेसुद्धा वाचा : महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं? 


शाहरुखच्या आधी आपल्यालाकडे 'मन्नत' बंगला खरेदी करण्याची संधी चालून आली होती. त्यावर वडील सलीम खान यांनी, 'तू इतक्या मोठ्या घरात काय करणार?' असा प्रश्न उपस्थित केला आणि तिथं ही संधी हुकली. इतक्या मोठ्या घराचा काहीच फायदा नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. हा प्रश्न फक्त सलमानच्याच वडिलांना पडला असं नाही, तर खुद्द सलमाननंही कुतूहलापोटी शाहरुखला, तो इतक्या मोठ्या घरात नेमकं करतो तरी काय? याबाबतचा प्रश्न विचारला. थोडक्यात काय, तर गतकाळात काही गोष्टींनी संपूर्ण भविष्यच बदललं असतं आणि आज ज्या मन्नत बंगल्यात बॉलिवूडचा 'किंग' राहतो, बंगल्याबाहेर येणाऱ्या चाहत्यांचं अभिवादन, त्यांचं प्रेम स्वीकारतो त्याच बंगल्यात अभिनेता सलमान खान राहत असता.