मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं आणि बॉलिवूडला आपला महानायक भेटला. आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता त्यांनी प्रेक्षकांचे मोठ्या उत्साहात मनोरंजन केले. वाढत्या वयामुळे आरोग्याच्या समस्या देखील समोर आल्या. परंतु त्यांनी मागे वळून पाहण्याचं धाडस कधीही केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता ते कलाविश्वला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आपण निवृत्त होत असल्याची कल्पना त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केली. सध्या ते 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मनालीमध्ये पोहोचले आहेत. 


मनालीला पोहोचण्याचा अनुभव त्यांनी शेअर केला, 'मनालीसारख्या सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी मला १२ तास लागले. शिवाय येथील रस्ते देखील खराब आहेत. खोल्या त्याचप्रमाणे वातावरणात देखील फार वेगळं वाटत आहे. त्यामुळे आता निवृत्त व्हाव लागेल.' असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. 


ब्रह्मास्त्र चित्रपटात बिग बींसोबत अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर देखील झळकणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अयान मुखर्जींच्या खांद्यावर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. 


'ब्रह्मास्त्र' चित्रपटाशिवाय बिग बी 'झुंड', 'गुलाबो सि‍ताबो', 'बटरफ्लाई' (कन्नड़), 'एबी आणि सीडी' (मराठी), 'उयरनधा' आणि 'चेहरे' या चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत.