`तुझ्या पातळीला न उतरून बाबाने स्वतःची...`; जान्हवी किल्लेकरला पॅडी कांबळेच्या मुलीने झापलं
Big Boss Marathi Janhavi Killekar Vs Pandharinath Kamble: सध्या पंढरीनाथ कांबळेबद्दल केलेल्या विधानाची मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये चांगलीच चर्चा असून टीकेची झोड उठली आहे.
Big Boss Marathi Janhavi Killekar Vs Pandharinath Kamble: 'बिग बॉस मराठी'च्या (Big Boss Marathi) घरातील वाद सध्या मराठमोळ्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. घरातील ज्येष्ठ कलाकारांबद्दल केल्या गेलेल्या विधानांवरुन अनेक मराठी कलाकारांनी आक्षेप नोंदवला आहे. सोशल मीडियावरील स्टार्सकडून वरिष्ठ कलाकारांवर टीका केली जात असतानाच जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) आणि निक्की तांबोळीने पंढरीनाथ कांबळेवर (Pandharinath Kamble) केलेल्या टीकेवरुन वाद निर्माण झालेला असतानाच आता त्याची लेक ग्रिष्मा कांबळेने पोस्टच्या माध्यमातून जान्हवी किल्लेकरला सुनावलं आहे. या पोस्टसाठी ग्रिष्मावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतंय
ग्रिष्माने तिच्या वडिलांनी पातळी सोडून टीका केलेली नाही याची आठवण करुन दिली. तसेच वर्षा उजगावकर आणि पंढरीनाथ कांबळींबद्दल बोलताना त्यांनी जितकं काम केलं आहे, जेवढा सन्मान मिळवला आहे तितका आधी मिळवावा, असा खोचक सल्ला ग्रिष्माने दिला आहे. ग्रिष्माने पोस्टमध्ये लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे वाचा तिचं
पोस्ट जशीच्या तशी...
प्रिय 'अभिनेत्री' जान्हवी किल्लेकर,
जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.
खरंतर 'ओव्हर अॅक्टींग' हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, कंटेस्टंटच्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी स्पेशल वर्षा उजगावकर आणि पंढरीनाथ कांबळीच्या करिअरवर बोलण्याआधी तुला त्यांच्याएवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.
मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस.
जेव्हा गेमबाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही. आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरासारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं! हा तुझा 'फेअर गेम' संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.
त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.
अनेक कलाकारांनी नोंदवली प्रतिक्रिया
पंढरीनाथ कांबळीवर केलेल्या टीकेवरुन अभिनेत्री विशाखा सुभेदारबरोबरच अभिजीत केळकरने पोस्ट लिहून आक्षेप नोंदवला आहे. ग्रिष्माने लिहिलेल्या पोस्टवरही विशाखा, अभिनेत्री नम्रता संभेरावने पोस्ट करत पाठिंबा दर्शवला आहे.
जान्हवी काय म्हणालेली?
जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीने पंढरीनाथ कांबळीच्या अभिनयावरुन तिच्यावर टीका केली होती. पंढरीनाथ कांबळी ओव्हर अॅक्टींग करतो. पंढरीनाथ कांबळी जोकर आहे असा पद्धतीच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या. त्यावरुनच हा वाद निर्माण झाला आहे.