बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी ऑडिशन्स सुरू
हॉलिवूडच्या `बिग ब्रदर`कडून प्रेरणा घेत भारतामध्ये `बिग बॉस` सुरू झालं.
मुंबई : हॉलिवूडच्या 'बिग ब्रदर'कडून प्रेरणा घेत भारतामध्ये 'बिग बॉस' सुरू झालं. हिंदीमध्ये अकरा यशस्वी पर्व केल्यानंतर इतर प्रादेशिक भाषांमध्येही बिग बॉस तुफान लोकप्रिय ठरलं आहे.
नुकतच मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला सुरूवात झाली आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारकांचा समावेश करण्यात आला आहे. पण लवकरच हिंदीतील 'बिग बॉस'चे 12वे पर्वदेखील सुरू होणार आहे.
ट्विटरवर घोषणा
कलर्स या वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन 'बिग बॉस'च्या बाराव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सोबतच एक खास माहिती देण्यात आली आहे. बाराव्या पर्वासाठी सामान्य लोकांचाही समावेश करण्यात येणार आहे. मात्र यंदा हा मामला 'जोडी'चा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या साथीदारासोबत ऑडिशनला या आणि बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवा असं आवाहन करण्यात आलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात येणार 'बिग बॉस12'
अंदाजे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास बिग बॉसच्या 12 व्या पर्वाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. मात्र ऑडिशन्सची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्याने त्याला लवकर सुरूवात करण्यात आली आहे.
बिग बॉसच्या 11 व्या पर्वाचं विजेतेपद अभिनेत्री शिल्पा शिंदेंने पटकावले होते. बिग बॉसचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अॅंकर. सलमान खानने लागोपाठ 8 पर्व होस्ट केले आहे. त्यामुळे यापुढे तोच 'होस्ट'च्या भूमिकेत दिसणार का ? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.