दीपिकाला अॅसिड हल्ल्याची धमकी
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी होते हे खरं असलं तरीही अनेकदा याच सोशल मीडियामुळे काही संकटंही ओढावतात.
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकारांमध्ये असणारी दरी कमी होते हे खरं असलं तरीही अनेकदा याच सोशल मीडियामुळे काही संकटंही ओढावतात. असंच संकट 'बिग बॉस' विजेची टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कड हिच्यावर ओढावलं असून, तिने मदतीसाठी थेट मुंबई पोलीसांकडे धाव घेतली आहे.
'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १२ व्या पर्वाचं विजेतेपद मिळवणं हे दीपिकासाठी कोणा एका स्वप्नाहून कमी नव्हतं. पण, हेच विजेतेपद आता तिला संकटात आणत आहे. दीपिकाला जेतेपद मिळाल्यानंतर त्यावंर सोशल मीडियाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये काही प्रेक्षकांनी तिचं समर्थन केलं. तर, काहींनी मात्र तिच्याऐवजी श्रीसंथला या रिअॅलिटी शोचं विजेतेपद प्रदान करायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली.
श्रीसंथ आणि दीपिका या दोघांच्याही चाहत्यांमध्ये यामुळे वादाची ठिणही पडल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर श्रीसंथच्या चाहत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकांनी मर्यादा तेव्हा ओलांडली, ज्यावेळी सोशल मीडियावर जाहीरपणे एका चाहत्याने दीपिकाला अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली.
आपल्याविरोधात चाहत्यांची असणारी ही वागणूक पाहता दीपिकाने थेट मुंबई पोलीसांकड मदत मागत त्यांच्या ट्विटर हँडलला नमूद करत एक ट्विट केलं. ज्यामध्ये संबंधित प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी तिने केली. तेव्हा आता हे ट्विट करणारं अकाऊंट आणि त्या व्यक्तीवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.