रिलस्टार म्हणून बिग बॉस 5 च्या घरात पोहोचलेला सुरज चव्हाण 'बिग बॉस विजेता' म्हणून घराबाहेर पडला आहे. सुरज चव्हाणने प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर आपलं यश निश्चित केलं. बिग बॉस विजेता सुरज चव्हाणने 70 दिवसांत दाखवलेला खेळ आणि त्याचा स्वभाव या सगळ्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकीय वर्तुळातूनही सुरज चव्हाणचं कौतुक होत आहे. 


खासदार सुप्रिया सुळेंकडून खास कौतुक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळेंनी सुरज चव्हाणचा व्हिडीओ शेअर केला आहे.  “कलर्स मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.”



नाना पटोले म्हणाले,'कुणालाही कमी...'


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील बिग बॉस विजेता सुरज चव्हाणचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करुन सुरजने खडतर परिस्थितीवर मात केल्याचं म्हटलं आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आलेला, हलाखीची परिस्थिती पाहिलेला, मंदिरातील नैवेद्याचे नारळ खाऊन आयुष्य जगलेला गुलीगत सूरज चव्हाण हा यंदाच्या बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. गेले काही महिने हा तळागाळातील युवक महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेला आणि शेवटी बुक्कीत टेंगूळ काढून स्पर्धेचा विजेता ठरला. एक गोष्ट खरी आहे, कुणालाही कमी समजायचं नसतं. इतरांची चाकरी करायची की, आपल्या आयुष्याचा ‘बॉस’ व्हायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. सूरज तुझं मन:पूर्वक अभिनंदन!



'जिंकलंस भावा...', ​जितेंद्र आव्हाडांचं विशेष ट्विट 


जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं की, 'आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून 3 वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद ( नैवद्य ) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा..' 


पुढे त्यांनी म्हटलं की, 'सुप्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला. अखेर त्याने मनाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सुरजची क्रेझ वाढली होती आणि आता अधिकच वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जिंकलंस भावा... तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे.'



रोहित पवारांची प्रतिक्रिया


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुरच चव्हाणचं कौतुक केलं आहे. सुरजच्या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला. 



उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया 


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सुरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. त्याने फक्त बारामतीचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच नाव उंचावलं आहे. 



बक्षिसाच्या रुपात काय मिळालं? 


सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यामुळे 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सूरजचा भरघोस बक्षीस मिळाली आहेत.