मुंबई  : अभिनेता हृतिक रोशनची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'सुपर ३०' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही चांगली दाद दिली आहे. त्यामुळे एकंदरच या साऱ्याचे पडसाद चित्रपटाच्या कमाईवरही होत आहेत. एकिकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असतानाच त्याच्या तिकिटांचे दर काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये हृतिकच्या या चित्रपटाला करमुक्त करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सोमवारी याविषयीची माहिती देत आनंद कुमार यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट बिहारमध्ये करमुक्त केल्याचं जाहीर केलं. १६ जुलैपासून चित्रपट करमुक्त असल्याचं जाहीर केलं. 


दरम्यान, शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला चित्रपटाच्या कमाईचे आकडे काहीसे धीम्या गतीने पुढे सरकत होते. पण, त्यानंतर मात्र कमाईने चांगलाच जोर पकडला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ११.८३ कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १८. १९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी २०. ५० कोटींची कमाई करत अखेर ५० कोटींच्या कमाईचा आकडा पार करण्यात 'सुपर ३०' यशस्वी ठरला. 



गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर हृतिकच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने टेलिव्हिजन अभिनेत्री मृणाल ठाकूर हीसुद्धा रुपेरी पडद्यावर झळकली आहे. तेव्हा आता गणिताची आकडेमोड करताना कमाईच्या बाबतीत हा चित्रपट नेमकी किती उंची गाठणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.