Birthday Special : मॅकेनिकचं काम करणारी व्यक्ती आज साऱ्यांच्याच गळ्यातील ताईत
ही उमपा दिली जाण्यात काहीच वावगं नाही...
मुंबई : काही व्यक्ती हे त्यांच्याकडे असणाऱ्या कलेमुळे ओळखले जातात. तर, काही मात्र त्यांच्या अस्तित्वामुळेच इतके मोठे होतात की त्यांच्यापुढे आभाळही त्याच्या विस्तीर्णतेला लाजतं. हिंदी कलाविश्वातील एका सेलिब्रिटीचं वर्णन करतेवेळी ही उमपा दिली जाण्यात काहीच वावगं नाही. कारण, अर्थात ती व्यक्तीच तशी आहे.
मानवी भावनांचा आधार घेत त्यांना शब्दांवाटे कागदावर उतरवणारी ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ गीतकार गुलजार. ज्या नावातच सारंकाही सामावलं आहे, असे गुलजार आजच्या घडीला हिंदी कलाविश्वात सर्वांसाठी आदर्शस्थानी आहेत. पण, प्रकाशझोतात येण्यापूर्वीचा संघर्ष या अवलियालाही चुकलेला नाही.
मुंबईत मोटर मॅकेनिक म्हणून काम करणारी व्यक्ती त्यांच्या कलेच्या बळावर इतकी प्रसिद्धी मिळवू शकेल यावर कित्येकांचा विश्वासही बसणार नाही. पण, संपूर्ण सिंग कालरा म्हणजेच गुलजार यांनी हे करुन दाखवलं. असं म्हटलं जातं, देशाची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचं कुटुंब अमृतसर येथे आलं. ज्यानंतर काही वर्षांनी गुलजार मुंबईत आले.
मुंबईत आल्यानंतर त्यांनी एका गॅरेजमध्ये मॅकेनिकचं काम सुरु केलं. अर्थार्जनासाठी त्यांनी बरीच मेहनत केली. पण, या साऱ्या संघर्षाच्या दिवसांमध्ये त्यांच्यातील कवीमनाची व्यक्तीसुद्धा कायमच डोकावायची. आपल्या या आवडीसाठी त्यांनी हे काम सोडून अखेर कलाविश्वाची वाट निवडली. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विमल रॉय, हृषिकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांचे सहायक म्हणून ते काम पाहू लागले. एस.डी. बर्मन यांच्या 'बंदिनी' या चित्रपटातून गीतकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
विविध विषयांना हाताळणारी आणि भावभावनांना समर्पकपणे मांडणारी असंख्य गीतं आणि शेर त्यांनी लिहिले. दूरदर्शनच्या 'जंगल बुक' या कार्यक्रमासाठी त्यांनी जंगल 'जंगल बात चली है पता चला है...' हे गाणंही गुलजार यांच्याच लेखणीतून साकारलेलं.
एकिकडे गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून गुलजार यशस्वी होत असतानाच त्यांच्या खासगी आयुष्याचा समतोल मात्र बिघडला होता. अभिनेत्री राखी यांच्याशी गुलजार यांनी लग्नगाठ बांधली. पण, त्यांच्या या नात्यातही बऱ्याचदा वादळ आलं. पण, उतारवयात मात्र हे वादळ काहीसं शमताना दिसत आहे.
आजच्या घडीलासुद्धा गुलजार यांच्या गीतांना प्रेक्षकांमध्ये मिळणारी लोकप्रियता कायम आहे. या साऱ्यामध्ये गुलजार यांची मुलगी म्हणजे मेघना गुलजार यासुद्धा एक यशस्वी दिग्दर्शिका म्हणून या कलाविश्वात स्थिरावत आहेत. आपल्या मुलीच्या चित्रपटासाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यामुळे वडील- मुलीची ही जोडीसुद्धा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या विशेष आवडीची आहे, असंच म्हणावं लागेल.