मुंबई : सत्तरीच्या दशकात आपल्या नावाचा धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्री मुमताज यांनी आज आपल्या वयाची सत्तरी पूर्ण केलीय. हीच अभिनेत्री एकेकाळी 'कपूर खानदाना'ची सून बनणार होती... परंतु, नशिबाला हे मान्य नव्हतं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुमताझला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं... आपल्या लहान बहिणीसोबत - मल्लिकासोबत ती एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओचे हेलपाटे घालत होती... अशातच १९५८ मध्ये त्यांना हिंदी सिनेसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला. अवघ्या १२ व्या वर्षी मुमताजनं 'सोने की चिडिया' या सिनेमात काम केलं... त्यानंतर स्त्री, वल्लाह क्या बात है, सेहरा यांसारखे अनेक सिनेमे त्यांनी केले. त्यानंतर मुख्य सिनेमांत ओपी रल्हान यांच्या 'गहरा दाग'मध्ये हिरोच्या बहिणीची भूमिका त्यांनी निभावली. 


साईड रोल करत असतानाच त्यांना एक चांगली संधी चालून आली. फ्रीस्टईल रेसलर दारा सिंह यांनी याच काळात सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यांच्यासोबत काम करण्यास इतर अभिनेत्री घाबरत होत्या... याच संधीचा फायदा मुमताजनं घेतला आणि त्यांनी दारासिंग यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. मग काय या दोघांनी फौलाद, रुस्तम ए हिंद, राकाक, वीर भीमसेन यांसारखे १६ सिनेमे एकत्र केले. १९६९ मध्ये आलेल्या राज खोसला यांच्या 'दो रास्ते' या सिनेमानं त्यांच्या करिअरला झळाळी दिली. याच सिनेमानंतर राजेश खन्ना आणि त्यांची जोडी पुढे हिट ठरली. 


या दरम्यान शम्मी कपूर आणि जीतेंद्र मुमताजसाठी वेडे झाले होते... मुमताज यांनी एका मुलाखतीत शम्मी कपूर आणि आपल्या प्रेमाबद्दल उघडपणे सांगितलं होतं. अवघ्या १८ वर्षांची असताना मुमताज 'ब्रह्मचारी'च्या सेटवर शम्मी कपूर यांच्या प्रेमात पडल्या. परंतु, कपूर खानदानाच्या परंपरेनुसार, स्त्रियांना सिनेमांत काम करण्याची परवानगी नव्हती. 


लग्नासाठी शम्मी कपूर यांनी मुमताजला अभिनय क्षेत्र सोडण्याची अट घातली. परंतु, आपल्यावर असलेल्या काही जबाबदाऱ्यांमुळे मुमताज यांनी मात्र आपल्या करिअरवर पाणी सोडण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे, हे नातं इथंच तुटलं. 


१९७४ साली २७ व्या वर्षी मयूर माधवानी या व्यावसायिकासोबत विवाह करून मुमताज यांनी परदेशाचा रस्ता धरला. मुमताज - मयूर यांना नताशा आणि तान्या अशा दोन मुली आहेत.