अनुष्काला घटस्फोट दे; संतप्त भाजप आमदाराचा विराटला सल्ला
वाद वाढतच चालला आहे...
मुंबई : Amezon Prime ऍमेझॉन प्राईमवर काही दिवसांपूर्वीच 'पाताल लोक' ही नवीकोरी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या वेब सीरिजने प्रेक्षकांचं असं काही लक्ष वेधलं की, सर्वत्र 'पाताल लोक'चाच गाजावाजा पाहायला मिळाला.
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या यशाचं श्रेय तिलाही देण्यात आलं. पण, याच यशाला वादाचं गालबोटही लागलं. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जरने तक्रार दाखल केली आहे. त्यांचा फोटो सीरिजमध्ये परवानगी न घेता छापला त्याबद्दल तक्रार दाखल केली.
आमदारांच्या आरोपानुसार या सीरिजमध्ये आरोपीचा उल्लेख करत असताना त्यांचा फोटो दाखवण्यात आला आहे. याच प्रकरणी त्यांनी अनुष्काविरोधात रितसर तक्रारही दाखल केली आहे. शिवाय आता म्हणजे त्यांनी अनुष्काचा पती म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला एक भलताच सल्ला दिला आहे.
गुर्जर यांनी दिलेला सल्ला पाहून कोणाच्या भुवया उंचावत आहे, तर कोणाचा संताप होत आहे. अब्रुनुकसानीचा दावा करत, त्यांनी विराटला थेट अनुष्कापासून घटस्फोट घेण्यासच सांगितलं आहे. माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे. 'विराट कोहली देसभक्त है.. देश के लिए खेलते है. उन्होने अनुष्का को तलाक दे देना चाहिए', असं ते म्हणाल्यामुळे आता नव्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.