मुंबई : जगभरातील कलाविश्वात सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे ती म्हणजे Avengers: Endgame या चित्रपटाची. फक्त परदेशातच नव्हे, तर भारतातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यापासून चित्रपटाविषयीच्या पोस्ट पर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळाला. या साऱ्याचे पडसाद चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शित होण्याच्या पहिल्या दिवसापासूनच Avengers: Endgame ने भारतीय बॉक्स ऑफिसवर दणका उडवल्याचं पाहायला मिळालं आहे. विविध चित्रपटांच्या कमाईचे आकडेही 'ऍव्हेंजर्स...'ने मोडित काढले आहेत. बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली होती. अवघ्या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने शंभर कोटींहून जास्त गल्ला जमवला आहे. तर, तिसऱ्या दिवशीसुद्धा हे आकडे आणखी वाढताना दिसत आहेत. 




चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांमध्ये Avengers: Endgame ने भारतात जवळपास १५७.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५३.१० कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५१.४० कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी एकूण ५२.७० कोटी रुपयांची कमाई केली. 



फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता हे सारंकही अद्वितीय असल्याचीच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. येत्या काळातही Avengers: Endgame ची जादू कायम राहिली तर, बॉलिवूडच्या इतर चित्रपटांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे ही सारी गणितं पाहता बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचंही लक्ष Avengers: Endgame च्याच कमाईवर लागलेलं आहे.