`अॅनिमल` चित्रपटातील `त्या` बलात्कार सीनवर बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला `या असल्या गोष्टी...`
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने `अॅनिमल` चित्रपटातील वैवाहिक बलात्कार सीनवरुन होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे. एका पात्राच्या क्षमता दाखवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं सांगितलं आहे.
'अॅनिमल' चित्रपटातील वैवाहिक बलात्कार सीनवरुन सध्या वाद पेटला आहे. त्यावरुन टीका होत असतानाच बॉबी देओलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पात्र कोणत्या पातळीला जाऊ शकतं हे दाखवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं बॉबी देओलने म्हटलं आहे. चित्रपटातील कथित पुरुषत्वाचे चित्रण आणि चुकीच्या स्त्री-पुरुष वर्तनाचे समर्थन यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. बॉबी देओलने एका मुलाखतीत या टीकेवर भाष्य केलं आहे.
The Quint ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने 'अॅनिमल' चित्रपटावर होणाऱ्या नकारात्मक टीकेवर मत मांडलं आहे. तसंच यावेळी त्याने अबरार हे पात्र नकारात्मक असल्याचं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बॉबी देओलला वैवाहिक बलात्कार सीनबद्दल विचारण्यात आलं असता त्याने, ते अबरारच्या पात्रासाठी तो सीन गरजेचा होता असं सांगितलं. हा चित्रपट समाजाला त्याचा आरसा दाखवणारा असून, त्यांचं प्रमोशन करत नसल्याचंही त्याने म्हटलं आहे.
"मी काहीही प्रमोट करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. पण याची गरज होती. फार कमी वेळात तुम्ही एखादी व्यक्ती काय करु शकते किंवा तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे कसं दाखवणार? हे सर्व सीन गरजेचे होते," असं बॉबी देओल म्हणाला आहे.
पुढे त्याने सांगितलं की, "फिल्ममेकर्स या नात्याने आम्ही समाजात जे काही सुरु आहे त्यापासून प्रभावित होत आहोत. जे काही लिहिलं आहे, तो समाजात सुरु असलेल्या गोष्टींचा प्रभाव आहे. आम्ही ते प्रमोट करत नाही आहोत. आम्ही अभिनेते असून, पात्र रंगवतो, लोकांचं मनोरंजन करतो. आणि जर तसंच असतं तर हा चित्रपट इतका हिट झाला नसता".
याआधी बॉबी देओलच्या पत्नीची भूमिका निभावणारी अभिनेत्री मानसी हिनेही या सीनची पाठराखण केली होती. अबरारची मानसिक स्थिती दर्शवण्यासाठी तो सीन गरजेचा होता असं ती म्हणाली. लोकांना काय वाटत आहे, याची मला जाणीव आहे. पण आमचा तो हेतू नव्हता असं ती म्हणाली.
यावेळी तिने अबरारचं पात्र कोणत्या स्थितीतून जात होतं हे स्पष्ट केलं. तसंच त्या सीनमधून कोणत्याही प्रकारचा छळ दाखवण्याचा हेतू नव्हता असंही मानसीने सांगितलं. मला सेटवर असताना किंवा स्क्रिप्ट वाचताना तो एक छळ म्हणून लोक पाहतील असं वाटलं नसल्याचं म्हटलं.
संदीप रेड्डी वंगाने 'अॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका, बॉबी देओल, अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाने भारतात 450 तर जगभरात 750 कोटींची कमाई केली आहे.