Laal Singh Chaddha : बॉयकॉट ट्रेंडनंतरही `लाल सिंह चड्ढा`ची कोटी उड्डाणे, जाणून घ्या जगभरातील कमाई
आमिर खानचा `लाल सिंह चड्ढा` भारतात फ्लॉप, पण जगभरात हिट
Laal Singh Chaddha Box Office Collection Day 19: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे अक्षरश: पाठ फिरवली. भारतात चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 65 करोड रुपयांचाही आकडा गाठता आला नाही.
चित्रपटाची 19व्या दिवसाची कमाई
आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी घट झाली आहे. एकोणीसव्या दिवशी चित्रपट 50 लाख रुपयेही कमवू शकलेला नाही. चित्रपटगृह अर्ध्याहून अधिक रिकामीच होती. गेल्या रविवारी चित्रपटाने 50 लाख रुपयांचं कलेक्शन केलं होतं.
असं असलं तरी आंतरराष्ट्रीय कमाईत 'लाल सिंह चड्ढाने' अनेक बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं आहे.
चित्रपटाची जगभरातील कमाई
'लाल सिंह चड्ढा' प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने जगभरात सर्वात जास्त कमाई उत्तर अमेरिकेत केली आहे. इथे आतापर्यंत चित्रपटाची कमाई आहे 22.82 कोटी रुपये. इंग्लंडमध्ये 6.64 कोटी तर ऑस्ट्रेलियामध्ये 6.41 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. कॅनडात 10.64 कोटी, न्यूझीलँडमध्ये 1.06 कोटी, सिंगापूरमध्ये 65 लाख, मलेशियात 56 लाख, जर्मनीत 36 लाख रुपयांचं कलेक्शन या चित्रपटाने केलं आहे.
'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचा रिमेक
आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा हा चित्रपट 1994 मध्ये आलेल्या 'फॉरेस्ट गंप' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. मोना सिंग आणि नागा चैतन्यही या चित्रपटात आहेत.
बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट फ्लॉप
'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला, याचा फटका चित्रपटाच्या कमाईवर झाला. पण या चित्रपटाशिवाय या काळात प्रदिर्शित झालेले बहुतांश चित्रपट फ्लॉप झाले आहेत. यात रणबीर कपूरचा 'शमशेरा', अजय देवगणचा 'रनवे 34', अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' आणि 'सम्राट पृथ्वीराज', शाहिद कपूरचा 'जर्सी', टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2', कंगना रणौतचा 'धाकड', आयुष्यमान खुरानाचा 'अनेक' आणि तापसी पन्नू 'दोबारा' हे चित्रपट सपशेल आपटले.