`हा` दाक्षिणात्य अभिनेता आमिरचा प्रेरणास्त्रोत
जाणून घ्या, तो अभिनेता आहे तरी कोण
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा त्याच्या चित्रपटांसोबतच आणखीही अनेक कारणांमुळे ओळखला जातो. किंबहुना हा अभिनेता अनेकांच्या प्रेरणास्थानीही आहे. एखादी भूमिका म्हणू नका किंवा एखादी कृती. आमिर प्रत्येक वेळी अशा काही अनुकरणीय गोष्टी करतो की ज्याची वेळोवेळी वाहवा केली जाईल. पण, तुम्हाला आमिरचा प्रेरणास्त्रोत नेमका कोण आहे याविषयी माहिती आहे का?
अष्टपैलू व्यक्तीमत्वं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरच्या प्रेररणास्थानी असणाऱ्या व्यक्तींमध्ये एका दाक्षिणात्य व्यक्तीच्या नावाचाही समावेश आहे. दाक्षिणात्य कलाविश्वातील ते प्रसिद्ध नाव आहे, अभिनेता चिरंजीवी यांचं. जपानमधील एका विमानतळावर नुकतीच आमिरची आणि अभिनेता चिरंजीवी यांची भेट झाली. याच भेटीचा एक फोटो त्याने पोस्ट केला. ज्यामध्ये आमिरने चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटाविषयी आपल्या गप्पा झाल्याचं सांगत ते आपल्या प्रेरणास्थानी असल्याचंही स्पष्ट केलं. परफेक्शनिस्ट आमिरचं हे साऊथ कनेक्शन त्याच्या आणि अर्थातच चिरंजीवी यांच्याही चाहत्या वर्गाला आश्चर्यचकित करुन गेलं.
गेल्या काही दिवसांपासून चिरंजीवी आणि त्यांची पत्नी हे जपानमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. मुलगी सुष्मिता केनिडेलाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम फोटोंमुळे याविषयीची माहिती समोर आली. तर, आमिर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. दोन्ही कलाकार त्यांच्या आयुष्यात व्यग्र असले तरीही त्यांची ही ग्रेट भेट मात्र चाहत्यांना सुखद दिलासा देणारी ठरली आहे, असंच म्हणावं लागेल.