`फार झालं, आता मला अजून....,` घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या आपल्या आगामी चित्रपट I Want to Talk च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. शूजित सरकार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यानिमित्ताने अभिषेक बच्चनने मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे, ज्यामुळे त्याला चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी प्रेरणा मिळाली. लहानपणी आराध्याकडे एक पुस्तक होते ज्यामध्ये एका पात्राने “मदत” हा जगातील सर्वात धाडसी शब्द म्हणून वर्णन केले होतं अशी आठवण त्याने सांगितली. अभिषेकने सांगितलं की, ही कल्पना त्याच्या मनात खोलवर रुजली, कारण मदत मागणे ही चिकाटी आणि आव्हानांना तोंड देण्याची इच्छा दर्शवतं “म्हणजे तू पराभव मान्य करण्यास तयार नाहीस. पुढे जाण्यासाठी जे काही लागेल ते मी करेन”. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना त्याने या भावना व्यक्त केल्या.
हाच दृष्टीकोन त्याने I Want to Talk चित्रपटातील अर्जून पात्राशी जोडला असल्याचं त्याने सांगितलं आहे. “तो मदत मागायला घाबरत नाही. तो हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत नाही. तो हार मानत नाही. एखाद्या व्यक्तीने ज्याने कित्येक वर्ष काही गोष्टींचा सामना केला आहे आणि हाताळत आहे, त्याला 31 वर्षांनंतर पुन्हा त्याच गोष्टींचा सामना करताना कंटाळा येणे आणि आता फार झालं, आता करायचं नाही असं म्हणणं खूप सोपं आहे. पण नाही, तो अजूनही अजूनही प्रयत्न करत आहे ही वस्तुस्थिती आहे... हीच गोष्ट त्याला खरोखर धैर्यवान बनवते”.
I Want to Talk चित्रपटाच्या निमित्ताने शुजित सरकार आणि अभिषेक बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याआधी शुजित सरकार यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह पिकू, गुलाबो सिताबो चित्रपटात काम केलं आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. अमिताभ बच्चन यांनी पिकू चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा त्यांचा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
I Want to Talk मध्ये अहिल्या बामरू, जॉनी लीव्हर, जयंत कृपलानी, पर्ल डे आणि क्रिस्टिन गोडार्ड यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत. अविक मुखोपाध्याय यांनी सिनेमॅटोग्राफी आणि चंद्रशेखर प्रजापती यांनी एडिटिंग केलं आहे.
दरम्यान चित्रपटसृष्टीत सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाल्याची चर्चा रंगली आहे. 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे विभक्त झाल्याच्या अफवा आहेत. मात्र दोघांनीही यावर भाष्य कऱणं टाळलं आहे. त्यांनी मौन बाळगल्याने या चर्चांना अधिक जोर मिळत आहे.