मुंबई : अभिनेता अजय देवगण याच्या वडिलांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. हिंदी कलाविश्वात साहसी दृश्यांच्या आखणीसाठी आणि विविध थरारक दृश्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, 'स्टंटमॅन' म्हणून वेगळी ओळख असणाऱ्या वीरु देवगण यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. ज्यामुळे त्यांना सांताक्रुझ येथे एका रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास ८० हून अधिक चित्रपटांमध्ये साहसदृश्य साकारण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. हिंदुस्तान की कसम या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं. वीरू देवगण यांनी साहसी दृश्य दिग्दर्शन आणि दिग्दर्शनाबरोबरच अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते. क्रांती (१९८१), सौरभ (१९७९) आणि सिंहासन( १९८६) या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. तर 'फूल और कांटे', 'हिम्मतवाला', 'प्रेम रोग', 'क्रांति', 'दो और दो पांच' या चित्रपटांमध्ये साहसी दृश्यांचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी चांगलीच वाहावा मिळवली होती.