मुंबई : ऐतिहासिक पात्रांच्या कार्यावर, प्रसंगांवर आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींवर मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. ही उदाहरणं प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची आणि प्रेरणादायी ठरली. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चमूतील आणखी एका पराक्रमी वीराच्या कार्याची. त्यांच्या गाथेची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून शूर आणि पराक्रमी तानाजी मालुसरे यांच्या अनन्यसाधारण लढाऊ वृत्तीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 


'बुद्धी... जी तलवारीप्रमाणेच धारदार होती..... ', असं कॅप्शन देत अजयने चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या कॅप्शनमध्ये त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. नव्या वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 



अजयने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टवर एक नजर टाकताच त्याच टीपलेले काही बारकावे लक्ष वेधत आहेत. नजरेतील क्रोधाग्नी, युद्धभूमी, मावळे... घोड्यावर बसून येणारे योद्ध्ये हे सारंच या पोस्टरमध्ये मांडण्यात आलं आहे. त्यावर 'तानजी : द अनसंग वॉरियर' असं चित्रपटाचं नावही ठळक शब्दांमध्ये लिहिण्यात आलं आहे. एकंदरच पुन्हा एकदा शिवकालीन इतिहासाचा थरार या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 



काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर, जगपती बाब, नेहा शर्मा हे कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत. ओम राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तेव्हा आता एका दमदार कथानकाची ताकद त्याला झेपते का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.