वीर `तान्हाजीं`चा सवाल, स्वराज्याहून मोठं आणखी काय?
अभिनेता अजय देवगन साकारत असणाऱ्या तान्हाजीची एक झलक पाहाच
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्ण काळ. अशा या सुवर्ण काळातील इतिहासाची काही पानं उलटली असता एक बाब लक्षात येते, की स्वराज्यनिर्मितीमध्ये आणि शत्रूशी दोन हात करणाऱ्यांमध्ये महाराजांना साथ मिळालेला प्रत्येक मावळा हा सर्वार्थाना अखिद महत्त्वाचा होता. प्रत्येकाची कामगिरी वेगळी, प्रत्येकाचं योगदानही तितकंच वेगळं. अशाच मावळ्यांमधील एक कर्तव्यनिष्ठ नाव म्हणजे तान्हाजी मालुसरे यांचं.
तान्हाजी मालुसरे यांचं साहस, त्यांची शौर्यगाथा पाहता अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमका असणाऱ्या एका चित्रपटातून दिग्दर्शक ओम राऊत याने, हीच गाथा रुपेरी पडद्यावर साकारण्याची जबाबदारी घेतली आहे. अजय देवगनचीच निर्मिती असणारा हा चित्रपट त्याच्यासाठी अधिक खास आहे. कारण, हिंदी कलाविश्वात त्याने तब्बल ३० वर्षे पूर्ण केली असून, प्रेक्षकांचं मनोरंजन करत दमदार अभिनय सादर करणाऱ्या अजयचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा शंभरावा चित्रपट आहे.
आपल्या कारकिर्दीतील हाच टप्पा एका खास चित्रपटाच्या निमित्ताने तो पार करणार आहे. सध्याच्या घडीला अजयच्या #TanhajiTheUnsungWarrior या आगामी चित्रपटाचा एक नवखा पोस्टर शेअर करत अभिनेता अक्षक कुमार याने त्याला कलाविश्वात ३० वर्षे योगदान दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाचा एक पोस्टर शेअर करत कशा प्रकारे मोठ्या ताकदीने अजयने त्याचा आलेख उंचावला ही भावना खिलाडी कुमारने कॅप्शनच्या माध्यमातून मांडली आहे. अक्षयने शेअर केलेल्य़ा या पोस्टरमध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या रुपातील अजयला पाहताना चित्रपटातील त्याच्या भूमिकेची व्याप्ती नेमकी कशी असेल याचा हलकासा अंदाज येत आहे. शत्रूवर रोखलेली नजर, त्याच शत्रूचं शिर धडापासून वेगळं करण्यासाठी हातात घेतलेली तलवार असं एकंदर रुबाबदार रुप पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. पोस्टर निरखून पाहिल्यास त्याक गडकिल्ले, युद्धभूमी आणि स्वराज्यासाठी पेटून उठलेले मावळे असं एकंदर चित्र पाहायला मिळत आहे. 'स्वराज से बढकर क्या?', म्हणजेच स्वराज्याहून मोठं आणखी काय? असा प्रश्नही पोस्टरवर झळकत आहे. अर्थात या प्रश्नाचं उत्तर हे चित्रपटातूनच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, #TanhajiTheUnsungWarrior 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर', हा चित्रपट १० जानेवारी २०२०ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं एकंदर कथानक आणि त्याचं महत्त्वं पाहता वर्षाची सुरुवात दणक्यात होणार ही बाब नाकारता येत नाही.