लॉकडाऊनचा अर्थ समजत नाही का? खिलाडी कुमार भडकला
आता जीव कंठाशी आला आहे....
मुंबई : कोरोना Corona व्हायरसचं संकट संपूर्ण जगभरात थैमान घालत असतानाच भारतातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच परिस्थितीमध्ये गर्दी टाळा असं म्हणत अखेर प्रशासनाकडून नाईलाजाने बहुतांश ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेत या एका मार्गाने कोरोनावर आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. पण, काहींनी मात्र या सर्व प्रयत्नांना आणि प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली.
गरज नसताना उत्साहीपणा दाखवणाऱ्या आणि परिस्थिती बिघडवणाऱ्यांचं हे असं बेताल वागणं पाहून अभिनेता अक्षय कुमार याना नाईलाजाने अतिशय संतप्त भाव व्यक्त करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
'नेहमी प्रेमाने बोलतो पण, आज प्रेमाने बोलणार नाही असं म्हणत व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या या संतप्त वाणीसाठी त्याने सर्वांची माफी मागितली आहे. तुमची हुशारी आणि उत्साहीपणा इथेच राहील. स्वतसोबत घरातल्यांनाही रुग्णालयात पोहोचवाल. मी चित्रपटांमध्ये स्टंटबाजी करतो पण, आता जीव कंठाशी आला आहे. अरे आतातरी परिस्थीचं गांभीर्य ओळखा. कुटुंबासाठी हिरो बना फक्त आणि फक्त घरातच थांबा.
सरकार जेव्हापर्यंत सांगतंय घरी राहा, तोपर्यंत घरातच थांबा. याने तुमचाच जीव वाचणार आहे. कोरोनाविरोधात आता युद्ध पुकारलं गेलं आहे. आपल्याला हे युद्ध हरवायचं आहे. घरात शांतबपणे बसून राहा. सरकार सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नका...' अशी ताकिद अक्षयने दिली आहे.
किमान त्याचा शब्द राखत तरी नागरिकांनी प्रशासनाचे निर्देश पाळावेत हीच एक विनंती.