मुंबई : आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. या पूरपरिस्थितीत खिलाडी कुमार अक्षय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या अक्षय कुमारने आसामच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधी आणि काजीरंगा नॅशनल पार्कसाठी १-१ कोटी रुपयांची मदत केली आहे. अक्षय कुमारने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आसाममधील हा विध्वंस अतिशय हृदयद्रावक आहे. माणूस किंवा जनावरे सर्वांसाठीच यावेळी मदत करणं अतिशय गरजेचे आहे. आसामच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधी आणि काजीरंगा नॅशनल पार्कसाठी १ कोटी रुपयांची मदत करत असून सर्वांनी पूरग्रस्त लोकांसाठी, जनावरांसाठी मदत करण्याची विनंती करत असल्याचं' त्यानं म्हटलंय.



यापूर्वीही, मे महिन्यात ओडिशामध्ये आलेल्या फेनी चक्री वादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना अक्षय कुमारने मदतीचा हात दिला होता. अक्षयने केरळ आणि चेन्नईमध्ये आलेल्या पूरग्रस्तांसाठीही मदत केली होती. 


आसाम, बिहारमध्ये आलेल्या पूरात आतापर्यंत जवळपास ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातही पूरामुळे १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. काजीरंगा नॅशनल पार्कचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. या नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ असणारे एकशिंगी गेंडे आढळतात. मात्र, पूरस्थितीमुळे अनेक प्राण्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे.


अक्षय कुमार सध्या मल्टीस्टारर 'मिशन मंगल' १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षय 'हाऊसफुल ४', 'गुड न्यूज', 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटातूनही अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.