मुंबई : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या काही आगामी प्रोजेक्टवर लक्ष ठेवून आहे. विविध भूमिकांना न्याय देणाऱ्या आमिरने दिग्दर्शन क्षेत्रातही त्याचं नशीब आजमावून पाहिलं. अष्टपैलू अभिनेता म्हणून आमिरची ओळख आहेच. त्यामुळे त्याची एकंदर कारकिर्द पाहता येत्या काळात तो पूर्णवेळ दिग्दर्शनाकडे कधी वळणार असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जायचा. ज्याचं उत्तर आमिरनेच दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारें जमीन पर' या चित्रपटाच्या निमित्ताने आमिरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण, सध्यातरी तो फक्त आणि फक्त अभिनय क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. ''माझा चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे ओघ आहे. योगायोगाने मी 'तारें जमीन पर' या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. मला चित्रपट साकारण्याचीही आवड आहे. पण, एकाच वेळी या दोन्ही गोष्टींपासून दूर राहू शकत नाही. पण, या क्षणाला मी हे सांगू शकतो की, अभिनेता म्हणून मी कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि या क्षेत्रात मला काम करायला आवड़तं', असं त्याने स्पष्ट केलं. एकदा आपण चित्रपट साकारण्यास सुरुवात केली तर त्या क्षणानंतर आपण अभिनय करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. या एका कारणामुळे सध्या त्याने त्याच्यात दडलेल्या दिग्दर्शकाला सर्वांच्या आड ठेवलं आहे. 


आमिर अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. 'लगान', तारें जमीन पर', 'जाने तू या जाने ना', 'पिपली लाईव्ह', 'दंगल', 'तलाश' आणि अशा इतरही चित्रपटांच्या निर्मितीमध्ये त्याने हातभार लावला आहे. चित्रपटांच्या माध्यमातून चांगल्या कथानकाला पसंती देत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचाच त्याचा हेतू असतो. पैसे कमावणं हा त्यामागचा एकमेव हेतू नसतो, असं त्याने अनेकदा स्पष्ट केलं आहे. 


सध्याच्या घडीला बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूड कलाविश्वात मिळणारी संधी पाहता आमिरलाही याविषयीचा प्रश्न करण्यात आला. तेव्हा आपल्याला एखादी चांगली संधी मिळाल्यास नक्कीच हॉलिवूडमध्येही काम करण्याची तयारी त्याने दाखवली. पण, हॉलिवूडप्रतीची आपार उत्सुकता किंवा वेड नसल्याची बाबही त्याने अधोरेखित केली. 'एक अभिनेता म्हणून चित्रपटातून कोणता संदेश मिळत आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यात एखादा सामाजिक संदेशच दडलेला असावा असा आपला अट्टहास नसतो', असंही त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात आमिर नेमक्या कोणत्या 'परफेक्ट' भूमिका बजावतो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.